सुरेंद्र राऊत ल्ल यवतमाळराज्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबविण्यासाठी शासनस्तरावर आतापर्यंत अनेक उपाययोजना करण्यात आल्या़ मात्र, त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. शेतकऱ्यांची स्थिती सुधारली नाही. आता शेतकरी आत्महत्येची पुन्हा नव्याने कारणमीमांसा केली जाणार असून, त्यासाठी यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. महसूल विभागाच्या वतीने हे सर्वेक्षण केले जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार आहे. यामध्ये गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह तालुका पातळीवरील इतर अधिकाऱ्यांचाही समावेश राहील. या समितीकडे तालुक्यातील प्रत्येक गावाच्या सर्वेक्षणाची जबाबदारी दिली जाणार आहे. गावपातळीवर सर्वेक्षणासाठी महसूल मंडळ अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असून, कृषी सहायक, ग्रामसचिव, तलाठी यांचा समावेश राहील. सर्व गावच्या शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्याच्या दृष्टीने गावनिहाय वेळापत्रक तयार केले आहे. या सर्वेक्षणामधून १५ प्रश्नांची प्रश्नावली भरून घेतली जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्याची संपूर्ण स्थिती स्पष्ट होणार आहे. यासाठी सर्वेक्षणासाठी किमान ४५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. तशा सूचना दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
शेतकरी आत्महत्येची नव्याने कारणमीमांसा
By admin | Published: February 17, 2015 1:34 AM