राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे १७०० कोटी रुपये पीक विम्याचे अग्रीम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. याचा लाभ राज्यातील विविध जिल्ह्यातील सुमारे ३५ लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. विम्याची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट वितरित करण्यास संबंधित विमा कंपन्यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
अग्रीम २५% प्रमाणे या विम्याचे वितरण करण्यात येत आहे. काही जिल्ह्यातील पीकविमा कंपन्या या अपिलात गेलेल्या आहेत. त्यांच्या अपिलावरील सुनावण्या पूर्ण झाल्यानंतर शेतकरी लाभार्थी संख्या व विम्याच्या रक्कमेत आणखी मोठी वाढ होणार आहे. राज्य सरकारने प्रथमच १ रुपयात पिकविमा योजना राबवली, ती राज्यातील १ कोटी ७१ लाख शेतकऱ्यांनी आपला विमा एक रुपयात भरून यशस्वी करून दाखवली असं, राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे सांगितले.
आज पहिल्या टप्प्यातील अग्रीम पीक विम्याच्या १ हजार ७०० कोटी रुपये रक्कमेच्या वितरणास सुरुवात होत असून, याचा मला मनस्वी आनंद आहे. त्याचबरोबर अपिलांचे निकाल व अन्य बाबी पूर्ण होतील, तसतसे उर्वरित ठिकाणच्या विम्याचाही प्रश्न मार्गी लागेल व लाभार्थी संख्या आणि लाभाच्या रक्कमेत देखील मोठी वाढ होणे अपेक्षित आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.