ऑनलाइन लोकमत
परभणी, दि. 3 - राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या शेतक-यांच्या संपाची तीव्रता वाढल्याचं दिसत आहे. शनिवारी परभणी-गंगाखेड रस्त्यावरील ब्राह्मणगाव फाटा येथे 10 वाहने अडवून या वाहनांमधील भाजीपाला रस्त्यावर फेकून देण्यात आला.
तर मानवत येथे शासकीय दूध डेअरीचा टँकर अडवून त्यामधील 3 हजार लीटर दूध रस्त्यावर सोडून देण्यात आले.
राज्यस्तरावर शेतक-यांचा संप मिटल्याच्या चर्चा सुरू असताना परभणी जिल्ह्यात मात्र संपाच्या तीव्रतेमध्ये वाढ झाल्याचे पाहावयास मिळत आहे. शनिवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास परभणी-गंगाखेड रस्त्यावरील ब्राह्मणगाव फाटा येथे किसान क्रांती समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी गंगाखेडकडून परभणीत येणारी भाजीपाला असलेली दहा वाहने अडविली.
या वाहनांमधील भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला. काही वाहनधारकांनी भाजीपाला रस्त्यावर टाकू नये, परत घेऊन जातो, अशी विनंती आंदोलकांना केल्यानंतर आंदोलकांनी त्यांना परत पाठवून दिले. कॉ. विलास बाबर यांच्या नेतृत्वखाली येथे आंदोलन करण्यात आले.
परभणी शहरातील शनिवार बाजारावर या आंदोलनाचा परिणाम झाल्याचे दिसून आले. बाजारामध्ये जवळपास २० ते २५ टक्केच किरकोळ व्यापारी सकाळी उपस्थित असल्याचे दिसून आले. शहरातील मोंढ्यातील व्यापा-यांनी शेतकरी संपास पाठींबा दिल्याने मोंढ्यातील व्यापा-यांची प्रतिष्ठाने कडकडीत बंद होती.
सेलू येथे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कडकडीत बंद पाठण्यात आला. शहरातील नागरिकांसह शेतक-यांनी बंदमध्ये सहभाग नोंदवत शहरात आलेला भाजीपाला व दूध रस्त्यावर फेकून दिले. तसेच शेतक-यांचा संप मिटलेला नाही, अशी फलके शहरभर लावण्यात आली. शहरातील आठवडी बाजार कडकडीत बंद होता. जिंतूरमध्ये शेतकरी संघटनेच्या वतीने फेरी काढून बंदचे आवाहन करण्यात आले आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद देत काही व्यापा-यांनी प्रतिष्ठानेही बंद ठेवली.
दवंडी देऊन भेंडीचे वाटप
मानवत तालुक्यातील ईरदळ येथील शेतक-यांनी बाजारपेठेत भेंडीची विक्री न करता शनिवारी सकाळी गावामध्ये दवंडी देऊन थेट भेंडी वाटप केली. यावेळी शेतक-यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. मानवत रोड येथील रेल्वे स्टेशन, रस्त्यावरील टी-पॉर्इंट येथे सकाळी ६ वाजेपासून शेतक-यांनी सेलू येथील बाजाराकडे जाणारी भाजीपाल्याची वाहने रोखून धरली.
रस्त्यावर सांडले दूध
मानवत रोड येथे शेतक-यांनी सकाळी ११.४० च्या सुमारास शासकीय दूध डेअरीचा टँकर अडवून त्यामधील ३ हजार लिटर दूध रस्त्यावर सोडून दिले. यावेळी लिंबाजी कचरे, रमेश साठे, माऊली निर्वळ, माधवराव निर्वळ, सुनील तारे, अशोक निर्वळ, मधुकर वाघ, दीपक लिपणे आदींची उपस्थिती होती.