"केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने लोकशाहीची सर्व मुल्ये, परंपरा पायदळी तुडवत बहुमताच्या जोरावर नवीन कृषी व कामगार कायदे बनवले. या कायद्यांविरोधात देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. चार महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत पण मोदी सरकार आपला ताठरपणा सोडायला तयार नाहीत," असे म्हणत काँग्रेसचे नेते नाना पटोलो यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. "या आंदोलनात आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. हे जुलमी, अन्यायी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी शेतकरी संघटनांकडून भारत बंद करण्यात आला असताना पंतप्रधान मोदी मात्र विदेशी गेले आहेत. हा अहंकार असून मोदी सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करू," असा इशारही पटोले यांनी दिला.शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारतबंदला काँग्रेसनं पाठिंबा दिला होता. "देशभरातील शेतकरी काळ्या कृषी कायद्यांविरोधात एकवटला असताना मोदी सरकारने त्यांची दखल घेतली नाही. हुकूमशाही वृत्तीच्या या सरकारने हे आंदोलन चिरडून टाकण्याचे प्रयत्न केले. दहशतवादी, नक्षलवादी, देशद्रोही संबोधून शेतकरी आंदोलनाला बदनाम केले. तर दुसरीकडे पेट्रोल, डिझेलवर अमाप कर वाढवून लूट चालवली आहे," असे पटोले यावेळी म्हणाले. डॉ. मनमोहन सिंग यांचे सरकार असताना पेट्रोलवर १ रुपये रस्ते विकास कर होता, तो मोदींनी तो १८ रुपये केला आणि त्यावर शेतकऱ्यांच्या नावाने लिटरमागे ४ रुपये सेस असे तब्बल २२ रुपये प्रति लिटरमागे लूट केली जात आहे. शेतकऱ्यांच्या नावावर वसुल केल्या जात असलेल्या ४ रुपयांतून मोदी सरकार दरवर्षी ७६ हजार कोटी रुपये कमावते आणि जुलमी कायदे आणून शेतकऱ्यांना देशोधडीलाही लावत आहे. केंद्रातील सरकार हे 'हम दो हमारे दो' चे सरकार आहे असेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांशी चर्चा करून कायदे करा - पृथ्वीराज चव्हाण"मोदी सरकारने कृषी कायद्यांना स्थगिती दिली आहे आता त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून नवीन कृषी कायदे केले पाहिजेत. हे नवीन कृषी कायदे संसदेच्या स्थायी समिती समोर ठेवावेत. जोपर्यंत हे नवीन कायदे होत नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. महागाई प्रचंड वाढली आहे. जगभरात भारतातच पेट्रोल डिझेल वर भरमसाठ कर लावलेले आहेत," असं म्हणत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावर टीका केली. भारतात लूट सुरू - भाई जगताप"मोदी सरकारने शेतकरी व कामगार कायदे बदलून त्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम केले आहे. कामगार चळवळीच्या माध्यमातून आपल्या हक्काच्या कायद्यासाठी कामगारांनी बलिदान दिले. ते कायदे बदलून मोदी सरकारने कामगार चळवळच मोडीत काढण्याचे पाप केले आहे. पेट्रोल, डिझेल हे पाकिस्तान, नेपाळमध्ये भारतापेक्षा स्वस्त आहे पण भारतात मात्र लुटमार सुरू आहे," असं म्हणत भाई जगताप यांनी केंद्रावर निशाणा साधला.