सांगली : केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्यांना भाजपाशासित राज्यांचाही विरोध आहे. त्यामुळे या राज्यातील शेतकरी २६ नोव्हेंबरला आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीकडे निघाले होते. पण, सरकारने त्यांना डांबून ठेवले, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे. तसेच, आठ डिसेंबरला शेतकऱ्यांनी पुकारलेल्या 'भारत बंद'मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा असेल, असे राजू शेट्टी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात खलिस्तानी शिरल्याचा अपप्रचार करून प्रांतवाद आणि जातीयवाद पसरवला जात आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या पाठिशी संपूर्ण देश उभा आहे. भाजपाशासित राज्यांतील शेतकरीही आंदोलनात सहभागी होत आहेत. भाजपाशासित राज्यातील लोक आंदोलनात २६ नोव्हेंबर रोजी सहभागी व्हायला निघाले होते. सरकारने त्यांना डांबून ठेवले. अनेक नेत्यांना दिल्लीपर्यंत जाऊ दिले नाही. तरीही आंदोलनाची तीव्रता कमी झालेली नाही, असे राजू शेट्टी म्हणाले.
याचबरोबर, शेतकऱ्यांना अडवण्यासाठी सरकारने रस्त्यात खंदक खोदली. शेतकरी अतिरेकी आहेत का? या आंदोलनाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. जागर करूनही केंद्र सरकार जागे होत नसल्याने आठ डिसेंबरला आम्ही भारत बंदची हाक दिली आहे. या आंदोलनात केवळ शेतकरीच नाही तर सामान्य नागरिकांनीही सहभागी झाले पाहिजे, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.
याशिवाय, केंद्र सरकार ढोंगीपणा करीत आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न जर आला तर ते राज्यांवर ढकलतात. केंद्र सरकार केवळ मूठभर उद्योगपतींसाठी राज्यात ढवळाढवळ करत आहे. आम्ही कुणीही मागणी केली नसताना कायदे का केले?' असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. तसेच, सरकारला शेतकऱ्यांचे कल्याण करायचे असेल तर हमीभाव का मंजूर करत नाही? असे म्हणत उसाला ज्या पद्धतीने हमीभावाचे संरक्षण आहे, तेच संरक्षण सर्व पिकांना द्या, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याबाबत सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही, हे चित्र असल्याने शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबरला 'भारत बंद'ची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या या 'भारत बंद'ला इंडियन टूरिस्ट ट्रान्सपोर्टर्स असोसिएशन आणि दिल्ली गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनने पाठिंबा दर्शविला आहे. ५१ ट्रान्सपोर्ट युनियन्सनी ८ डिसेंबरला शेतकऱ्यांच्या 'भारत बंद'ला समर्थन दिले आहे