ठाणे- ठाण्यातील आनंदनगरमधल्या चेकनाका इथून सकाळी 10 वाजता शेतकऱ्यांच्या मोर्च्याला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आदिवासी आपल्या न्याय मागण्यासाठी ठाणे ते आझाद मैदान 45 किमी अंतर पार करून मुंबई विधानसभेवर धडकणार आहेत. हजारो शेतकरी दुष्काळ असताना सुद्धा दुष्काळाचे चटके सोसत एकत्र येत सकाळी 10 वाजता ह्या मोर्चाची सुरुवात "आनंद दिघे प्रवेशद्वार "येथील जुना चेकपोस्ट नाका येथून लोकसंघर्ष मोर्च्याच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे.या सभेचे अध्यक्ष ज्येष्ठ न्यायाधीश बी. जे. कोळसे-पाटील असतील. त्याबरोबर पाणीवाले बाबा राजेंद्र सिंह, कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव, सुभाष वारे, स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, काळू राम काका दोधडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. यावेळी राष्ट्र सेवा दलाचे शरद कदम, भारत बचाव आंदोलनाचे फिरोज मिठीबोरवाला, विद्यार्थी भारती संघटनेच्या स्मिता साळुंखे, ज्योती बढेकर, सामाजिक कार्यकर्ते रवी भिलाणे, धनंजय शिंदे, ज्येष्ठ कार्यकर्ते संजय महाजन, राजू गायकवाड, सचिन धांडे या मोर्च्यात सहभागी होत आहेत. संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, खान्देश, सांगली, साताऱ्यासह ठाणे, पालघर जिल्ह्यांतील शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत. आदिवासी माता भगिनींची आजपासून पायी रॅली सुरू झाली आहे. आज पहाटे 4 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत कसारा रेल्वे स्थानकावरून सुमारे आठ ते दहा हजार मोर्चेकरी लोकलने ठाण्याकडे रवाना झाले आहेत. या मोर्चात 50 हजारांहून अधिक लोक सहभागी होणार असल्याचे मोर्चाचे नेतृत्व करणारे प्रकाश बारेला यांनी सांगितले. शेतक-यांना आश्वासन दिलेली नुकसानभरपाई त्वरित मिळावी. वन विधायक कायद्याची अंमलबजावणी करून आदिवासींच्या नावावर जमिनी व्हाव्यात यासह अनेक लोकाभिमुख मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.२२ तारखेला सोमय्या मैदानातून पहाटे निघणार 21 तारखेला हा शेतकरी मोर्चा सोमय्या मैदानावर पोहोचणार असून, 22 तारखेला पहाटे सोमय्या मैदानातून निघणार आहे. सायन, दादर, भायखळा जे. जे. फ्लायओव्हर मार्गे आझाद मैदान येथे मोर्चा पोहचल्यावर येथे सभा होईल. मागण्या मान्य झाल्याशिवाय उठायचे नाही या निर्धाराने आम्ही लढण्याचे ठरवले आहे, असं लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे म्हणाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या 1)उत्पादन खर्चाच्या दीड पट हमी भाव मिळावा व तो मिळण्यासाठी न्यायिक व्यवस्था तयार करण्यात यावी.2)पिढ्यानपिढ्या वनजमिनी कसत असलेल्या शेतकऱ्यांना वनाधिकार कायद्यातील तरतुदीप्रमाणे त्वरित त्या जमिनीचे मालक बनवण्यात यावे. व त्यानंतर त्यांच्या जमिनी सुधारण्यासाठी कायद्यातील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करून त्याचा आराखडा सादर करावा3) विजेवर सर्वांचा समान अधिकार असल्यामुळे शहराप्रमाणेच शेतकऱ्यांना सुद्धा समान लोड शेडींग असावी. व शेतकऱ्यांना वीजपुरवठा दिवसा करण्यात यावा4 )वनपट्टे धारकांना व ज्यांचे वन दावे प्रलंबित आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना दुष्काळाची मदत व पिक कर्ज मिळावे. कारण ही मदत एकूण शेती व्यवसाय तोट्यात असल्यामुळे देण्यात येते त्यामुळे त्यांचा या मदतीवर अधिकार आहे.5 )पेसा कायद्यामध्ये शेड्युल्ड 5 अंतर्गत येणाऱ्या गावांची पुनर्रचना करून वगळण्यात आलेली गावे समाविष्ट करून घेण्यात यावी .6) दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करून त्यांनी आता केलेले शुल्क परत मिळावे. 7)दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये दारिद्र्य रेषेखालील किंवा त्यावरील असा भेदभाव न करता सरसकट दोन रुपये किलोने धान्य मिळावे. 8)आपत्ती निवारण कायद्याप्रमाणे जिरायत जमिनीला हेक्टरी 50 हजार व बागायत जमिनीला हेक्टरी एक लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे 9) 2001 पूर्वी कसत असलेल्या गायरान जमीन धारकांना कायदेशीर पूर्तता करून कसत असलेल्या गायरान जमिनी चे त्यांना मालक बनविण्यात यावे व तोपर्यंत त्यांना पिक कर्ज नुकसान भरपाई हे लाभ देण्यात यावे 10)दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजना व स्वाभिमान सबलीकरण योजना या अंतर्गत महाराष्ट्रात येत्या काळात किती दलित व आदिवासिंना जमीन मिळणार आहे याचा आराखडा सादर करावा.
ठाणे ते विधानभवन पायी रॅली; न्यायासाठी बळीराजा धडकणार राजाच्या दरबारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 11:50 AM