लोकमत न्यूज नेटवर्कपुणतांबा(अहमदनगर) : पुणतांबेकरांनी शेतकरी संपावर जाण्याचा ऐतिहासिक ठराव केला. त्यानुसार राज्यात सर्वत्र संपाचे लोण पसरले. या पुणतांबा ठरावाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंमलबजावणी करावी, असे आवाहन किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी पुणतांबा येथे केले.पुणतांब्यात येऊन कॉ. नवले यांनी गावातून अनवाणी पायी चालून आत्मक्लेश व्यक्त केला. या आंदोलनात शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी डॉ. नवले म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा करून संप मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव आणला. सरसकट सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी, शेतीमालाला हमीभाव, पेन्शन योजना आदी मागण्या मुख्यमंत्र्यांनी पूर्ण कराव्यात, अशी चर्चा नाशिक येथील बैठकीत झाली आहे. संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही. सर्वांनी एकत्रित येऊन संपाची व्याप्ती वाढवावी. पुणतांब्याच्या ग्रामसभेने ठराव केल्याने राज्यातील शेतकरी संघटित झाला आहे. त्यामुळे पुणतांबा ही या संपाची कर्मभूमी असून,येथील शेतकऱ्यांना सलाम केला आहे. समन्वय समिती स्थापणारनाशिक येथील बैठकीत संपाची रूपरेषा ठरवण्यात आली. यात समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. खा. राजू शेट्टी, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील, आ.बच्चू कडू यांच्यासह कृषी तज्ज्ञ, विचारवंत तसेच संघटनेतील सदस्य मिळून समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समन्वय समिती मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेल, असे नवले म्हणाले.महाराष्ट्र बंदच्या आवाहनानुसार पुणतांब्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. गेल्या पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनातआहे.
पुणतांब्यात शेतकऱ्यांचा आत्मक्लेश
By admin | Published: June 06, 2017 5:36 AM