बोरगाव मंजू (जि. अकोला): मी मुख्यमंत्र्यांचा ह्यफॅनह्ण असून एकदा तरी त्यांनी माझ्या कुटुंबाला भेट द्यावी, अशी अंतिम इच्छा व्यक्त करून, सततच्या नापिकीला कंटाळलेल्या एका शेतकरीपुत्राने आत्महत्या केल्याची घटना अकोला जिल्ह्यातील कौलखेड गोमासे येथे शनिवारी रात्री घडली. मंगेश गणेश उमाळे (२७) हे त्या दुर्दैवी शेतकरीपुत्राचे नाव आहे. शनिवारी रात्री या सुशिक्षित युवा शेतकर्याने अंबिकापूर शेतशिवारातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. रविवारी सकाळी ग्रामस्थांना झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळला. बोरगाव मंजू पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. पोलिसांना मंगेशजवळ त्याने मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळली. सततच्या नापिकीमुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे मंगेशने चिठ्ठीत नमूद केले आहे. पत्रात काही ठिकाणी इंग्रजीचाही वापर करण्यात आला आहे. मंगेशचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. या प्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास ठाणेदार भास्कर तंवर, जमादार जनार्दन चंदन, हरीश सातव करीत आहेत.
*मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाची भेट घ्यावी!
मी सुरुवातीपासून मुख्यमंत्रांचा ह्यफॅनह्ण आहे, त्यांनी आपल्या कुटुंबियांची एकदा अवश्य भेट घ्यावी, अशी शेवटची इच्छा मंगेशने चिठ्ठीतून व्यक्त केली आहे.