वर्धा :
विदर्भात जुलै महिन्यातील अतिवृष्टीने पिकांना मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री, विरोधी पक्षनेते, केंद्रीय समिती, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे शिष्टमंडळ आदी राज्यकर्त्यांनी पाहणी दौरे केले. दौरे आटोपले; पण अद्याप नुकसानभरपाईचा पत्ता नाही. त्यामुळे आणखी किती दौरे करणार साहेब, मदत द्या, असा संतप्त सवाल हताश शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
सोयाबीन, तूर, कपाशी आदी पिकांचे अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले. अनेकांच्या शेती पाण्याखाली आल्याने पिके खरडून गेली. अनेक गावांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले. अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली. हवालदिल शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, विरोधी पक्ष नेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी पालकमंत्री सुनील केदार आदी नेते येऊन गेले. मात्र, अद्याप मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांत कमालीचा रोष असून, आता आश्वासन नको, आर्थिक मदत हवी, अशी मागणी शेतकरी करू लागल्याचे चित्र आहे.
पावसाच्या नुकसानीचेही पंचनामेअनेक भागांत कमी पाऊस झाला तरी बांध फुटल्याने शेतीपिकांचे नुकसान झालेले आहे. अनेक भागांत अतिवृष्टी नाही मात्र, सततच्या पावसाने नुकसान झाले आहे. त्या ठिकाणी ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याचे निदर्शनात आल्यास तेथेही पंचनामे करा. एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे कृषिमंत्र्यांनी यंत्रणेला बजावले.