औरंगाबाद : सुखना धरणात विष कालवण्याचे रॅडिको डिस्टिलरी कंपनीचे कारनामे ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर शेतकरी, पर्यावरणप्रेमी, पक्षीमित्र रस्त्यावर उतरले असून बुधवारी त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर धडक मारली. कंपनी बंद करण्याची मागणी आंदोलकांनी केली.सुखना धरणात लाल रंगाचे रसायनयुक्त विषारी पाणी सोडण्याऱ्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील रॅडिको डिस्टिलरी कंपनीचे कारनामे ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनद्वारे चव्हाट्यावर आणले. त्यानंतर अधिकारी जागे झाले. कुंभेफळ, टाकळी वैद्य, टाकळी शिंपी, लाडगाव, टोणगाव, भालगाव परिसरातील शेतकरी पर्यावरणप्रेमी, पक्षीमित्रांचा मोर्चा सकाळी चिकलठाणा औद्योगिक वसाहतीच्या प्रदूषण नियंत्रण मंडळावर धडकला. कंपनीवर गुन्हे नोंदवून ती बंद करण्यासह भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली.प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी धनंजय पाटील व उपप्रादेशिक अधिकारी अमोल काटोले रॅडिकोच्या विष प्रयोगाचा अहवाल सादर करण्यासाठी मुंबईला गेले होते. त्यामुळे क्षेत्रीय अधिकारी डॉ. अर्जुन जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांना आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. संतप्त शेतकऱ्यांना उत्तरे देताना अधिकाऱ्यांना घाम फुटला. (प्रतिनिधी)
‘रॅडिको’विरोधात शेतकरी रस्त्यावर
By admin | Published: June 25, 2015 1:19 AM