शेतकऱ्याची आत्महत्या; बँक अधिकाऱ्यावर गुन्हाजामखेड/अंबड (जि.जालना) : नापिकी आणि कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येप्रकरणी युनियन बँकेच्या जामखेड शाखा व्यवस्थापकासह कृषी अधिकाऱ्यावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.अंबड तालुक्यातील माळीवाडी येथील सुरेश चंद्रकांत चेडे (४२) यांनी सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. युनियन बँकेचे जामखेड शाखेचे व्यवस्थापक के. टी. कांबळे व बँकेच्या कृषी अधिकाऱ्यास त्यासाठी कारणीभूत ठरवून गुन्हा दाखल झाला.सुरेश चेडे यांच्यावर युनियन बँकेचे ८० हजार रुपयांचे कर्ज होते. कर्ज भरल्यास पुन्हा नव्याने कर्ज देण्याचे आश्वासन कांबळे यांनी दिले होते. त्यानुसार चेडे यांनी उसणवारी करून ८० हजारांचे कर्ज फेडले. मात्र त्यांना पीककर्ज म्हणून केवळ ३७ हजार रूपये मंजूर झाले. त्यानंतर चेडे यांचे शेततळ््याचे ३ लाख ६५ हजार रूपये कर्ज मंजूर झाले. खोदकामासाठी त्याचा एक लाख चार हजार रूपयांचा पहिला हप्ता देण्यात आला. मात्र उर्वरित रक्कम देण्यासाठी २५ हजार रूपये विमा पॉलिसीत भरण्याचे कांबळे यांनी सांगितले. पैसे नसल्याने चेडे यांनी त्यास नकार दिला होता. ते दीड महिन्यांपासून बँकेत खेटे घालीत होते. (वार्ताहर)
शेतकऱ्याची आत्महत्या; बँक अधिकाऱ्यावर गुन्हा
By admin | Published: August 19, 2015 12:56 AM