चिखली : गेल्या चार वर्षांपासून भेडसावणारा दुष्काळ, सततची नापिकी व डोक्यावर कर्ज या विवंचनेतील तालुक्यातील आदर्श ग्राम खोर येथील एका ४५ वर्षीय शेतक-यांने आपल्या स्वत:च्याच शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
चिखली तालुक्यातील आदर्श ग्राम खोर येथील शेतकरी केशवराव भाऊराव साखरे हे मंगळवार १८ एप्रिल रोजी शेताकडे जातो असे सांगून घरून निघून गेल्यानंतर सायंकाळी बराच उशीर होवूनही घरी न परतल्याने शेतात जाऊन पाहिले असता खोर शिवारातील स्वत:च्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. केशवराव साखरे यांच्याकडे ५ एकर कोरडवाहू जमीन असून त्यांनी स्टेट बँकेकडून १ लाख व पिंपळगाव सराई बिगर शेती ग्रामीण सहकारी पतसंस्थेकडून १ लाख ५० हजार हजार रूपयांचे कर्ज घेतले होते. गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने नापिकीमुळे व बँकेचे थकीत कर्ज झाल्याने त्यांनी कंटाळून आत्महत्या करण्याचा मार्ग निवडला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि मुलगा असा परिवार असून घरातील कर्त्या पुरूषाने आत्महत्येचा मार्ग अवलंबल्याने हे कुटूंब निराधार बनले आहे. (तालुका प्रतिनिधी)