लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा/ वर्धा/ उस्मानाबाद : संपूर्ण कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी राज्यात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असतानाच कर्जबारीपणाला कंटाळून विदर्भ तीन आणि मराठवड्यात दोन शेतकऱ्यांनी मृत्यूस कवटाळल्याच्या घटना घडल्या आहेत.बुलडाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील परतापूर येथे संजय रामराव घनवट (४६) या शेतकऱ्याने सोमवारी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतीसाठी काढलेल्या कर्जाचा डोंगर वाढतच होता. त्यातच उपवर मुलीच्या लग्नासाठी पैसे कुठून आणायचे असा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता. या ताणातूनच त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. त्यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी आहे.वर्धा जिल्ह्याच्या आकोलीमध्ये ईश्वर बळीराम इंगळे (५६) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ईश्वर यांनी शेतीसाठी बँकेतून जवळपास ३ लाखाचे कर्ज घेतले होते. त्यातच खरीपाच्या तोंडावर त्यांच्याकडील एक बैल दगावला. परिणामी, मशागतीची कामे कशी करावी असा प्रश्न त्यांना भेडसावत होता.अकोल्याच्या अकोट तालुक्यातील उमरा येथील गणेश काळबेंडे या अल्पभूधारक शेतकऱ्याने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील कलदेव लिंबाळा येथील गुरुनाथ गुंडू ढोणे (२९) या शेतकऱ्याने सोमवारी मध्यरात्री कर्जास कंटाळून गळफास घेतला. बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील हिवरवाडीतील सूर्यभान बाबूराव गुंजाळ (५५) या शेतकऱ्याने बँकेचे कर्ज कसे फेडायचे, या विंवचनेतून विषप्राशन केले. येवला तालुक्यातील पिंपरी येथील नवनाथ चांगदेव भालेराव (३०) या तरु ण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.
संप काळातही शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच
By admin | Published: June 07, 2017 4:40 AM