मुंबई - विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी नाशिकहून मुंबईपर्यंत काढलेला लाँग मार्च आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. रविवारी सोमय्या मैदानात विसावलेल्या या महामोर्चाने आज रात्री एकच्या सुमारास सोमय्या मैदानाकडून आझाद मैदानाकडे कूच करत पहाटे पाचच्या सुमारास आझाद मैदान गाठले. दहावी आणि बारावीच्या परिक्षा सुरु आहेत. मोर्चामुळं विद्यार्थांना त्रास होऊ नये म्हणून रात्रीच मोर्चेकरी आझाद मैदानाकडे जाण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान सभेने घेतला होता. त्यानुसार हजारोंच्या संख्येने मुंबईत दाखल झालेले शेतकरी आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाले. आझाद मैदानाकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या सोयीसाठी बेस्ट प्रशासनाकडून बसची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र बहुतांश मोर्चेकरी पायीच आझाद मैदानाकडे निघाले. अखेर रात्री तीन ते चार तास पायपीट करत या शेतकरी आंदोलकांनी आझाद मैदान गाठले.
2008 मध्ये तयार करण्यात आलेल्या वन हक्क कायद्याची त्वरित अंमलबजावणी करावी, यासहीत अन्य मागणीसाठी राज्य किसान सभेच्या वतीने नाशिकहून हजारे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सुरू केलेला लाँग मार्च रविवारी मुंबईत धडकला होता. हजारो शेतकऱ्यांच्या सहभागामुळे लक्षवेधी ठरलेल्या या मोर्चाला शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी पाठिंबा जाहीर केला होता. तर हा मोर्चा मुंबईत दाखल झाल्यावर सत्ताधारी भाजपाच्यावतीने मंत्री गिरीश महाजन हे मोर्चेकऱ्यांना भेटले होते. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार सकारात्मक असून उद्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा करणार आहे. त्यावेळी विविध खात्यांचे पदाधिकारी चर्चेत उपस्थित राहतील असं आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. विधान भवनाला घेराव नाशिकमधून शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि हमीभावासह अन्य मागण्यांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेल्या शेतक-यांच्या मोर्चाने 35 हजार शेतक-यांसह किसान मोर्चाने मुंबईत प्रवेश केला आहे. हा मोर्चा आता सोमवारी सकाळी विधान भवनाला घेराव घालणार आहे.