धामणगाव रेल्वे : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून विदर्भात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. गेल्या तीन दिवसांतील या घटना असून एकाने विहिरीत उडी मारून तर, दुसऱ्याने विषप्राशन करून आणि तिसऱ्याने पाण्याच्या टाकीवरून उडी मारुन आपले जीवन संपविले.धामणगावरेल्वे तालुक्यातील पेठरघुनाथपूर येथे कपाशी व तुरीला मोड आल्याने गजानन ज्ञानेश्वर शेलोटे (३५) या कर्जबाजारी शेतकऱ्याने शनिवारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. परिवाराचा उदरनिर्वाह कसा करावा, हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापळ येथे सततच्या नापिकीमुळे अजय प्रकाश खरीपकार (२५) याने विषप्राशन करून आत्महत्या केली. महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतातील पीक जगवावे कसे, तसेच दुबार पेरणी कशी करावी याची चिंता त्याला सतावत होती. त्यामुळे गुरुवारी घरात कुणीही नसल्याची संधी साधून त्याने विषारी औषध प्राशन केले. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ, बहीण असा बराच मोठा आप्त परिवार आहे. कर्जाचा वाढता डोंगर आणि नापिकीला कंटाळून वर्ध्यात हेमंत होमदेवराव घोडखांदे (३७) या शेतकऱ्याने पाण्याच्या टाकीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री शेतात जात असल्याचे सांगून तो घरून निघून गेला मध्यरात्र होऊनही तो परतला नाही. शनिवारी सकाळी गावातील पाण्याच्या टाकीखाली त्याचा मृतदेहच आढळून आला.
विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र कायम
By admin | Published: July 20, 2015 1:04 AM