- संजय पाटील, अमळनेर
गावाला कायमस्वरूपी टॅँकरमुक्त करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून अमळनेर तालुक्यातील नगाव येथील बापू कोळी यांनी गावात तब्बल ५० शेततळी निर्माण केली. एकाच गावात एवढी शेततळी करण्याचे राज्यातील हे एकमेव उदाहरण असावे. पावसाळ््यात शेततळ््यांमुळे १२० दशलक्ष घनफूट पाणीसाठा होऊन २५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.पाणीटंचाईमुळे नगावला टॅँकरने पाणीपुरवठा होत आहे. जलयुक्त शिवार योजनेत गावाची निवड झालेली नाही. बापू कोळींनी जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांची परवानगी घेऊन गावठाण जागेत स्वखर्चाने ८८ बाय ७८ मीटरचे मोठे शेततळे तयार केले. शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा फायदा घेत, किरण गोसावी, दिनेश पाटील यांना सोबत घेऊन कृषी पर्यवेक्षक योगेश वंजारी यांच्या पथकाचे सहकार्य घेत, शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली. अनुदानातून संपूर्ण काम करणे शक्य नसल्याने, त्यांनी पोकलँडसाठी डिझेलचा स्वत: खर्च करून ५० शेततळी अवघ्या काही दिवसांत पूर्ण केली. गावशिवारातून वाहणाऱ्या खडकी नाल्यातून वाहून जाणारे पाणी एका पाइपलाइनद्वारे मोठ्या शेततळ्यात वळविण्यात आले, तर नैसर्गिक प्रवाहाला जोडून सलग आठ शेततळी तयार केली आहेत. त्यामुळे शेतशिवारातून वाहून जाणाऱ्या पाण्याने एकापाठोपाठ एक आठही शेततळी भरतील. तेवढ्या पाण्यात १०० हेक्टर जमीन ओलिताखाली येईल, असा अंदाज आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळही दोन शेततळी केली आहेत. हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ. रवींद्र चौधरी यांनी सुमारे १० लाख रुपये खर्च करून, चिखली नदीचे ८०० मीटर लांब व चार ते पाचमीटर खोलीकरण केले. गावविहिरीतील बंधाऱ्यात पाणी साचल्याने, १२ महिने पाणी राहणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटून गाव टॅँकरमुक्त होईल.जुलै महिन्यात सुमारे १० हजार शेवग्याची झाडे शेततळ््यांच्या बांधावर लावण्यात येणार आहेत. परिणामी, झाडांची मुळे बांधाची माती धरून ठेवतील व शेततळ््यांचे आयुष्य वाढेल, तर शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल.गावातील पाण्याबरोबरच सिंचनाचा प्रश्न सुटण्याच्या हेतूने शेततळ््यांची निर्मिती केली आहे. माझ्यापासून सुरुवात करून, होणाऱ्या फायद्यांबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. शेतकरी तयार झाल्याने, शेततळ््याचे अर्धशतक पूर्ण होऊ शकले. - बापू कोळी, नगाव, ता. अमळनेर