जालना: राज्यातील शेतकऱ्यांना गारपिटीमुळे पिकांच्या नुकसानीबरोबरच पशुधनाची हानी झाल्यामुळे दुहेरी फटका बसला आहे. या सगळ्याची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना सध्या सरकारी अधिकाऱ्यांच्या कृपाकटाक्ष आपल्यावर कधी पडेल, याची प्रतिक्षा करावी लागत आहे. जालन्यात यामुळे अनेक जनावरांचे मृतदेह गोठ्यातच पडून आहेत. गारपिटीमुळे मृत्यू पावलेल्या जनावरांचे शवविच्छेदन केल्याशिवाय मदत मिळणार नाही, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, अद्यापपर्यंत अनेक ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांकडून पंचनामे होण्याचे काम बाकी आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी गारपिटीत मृत्यूमुखी पडलेली त्यांची जनावरे घराबाहेर तशीच ठेवून दिली आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण सध्या या भागाचा दौरा करत आहेत. यावेळी त्यांना अनेक शेतकऱ्यांच्या घरासमोर मेलेली जनावरे आढळून आली. यावरून विरोधकांकडून भाजपा सरकारला धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे. विदर्भातदेखील पक्ष्यांना गारपिटीचा मोठा फटका बसला. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे मंगळवारी रात्री झालेल्या तुफान गारपिटीत 300 पोपटांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. गेल्या अनेक वर्षांपासून येथील शिव मंदिराजवळ पिंपळाच्या झाडांवर पोपटांची मोठी वस्ती होती. मंगळवारच्या तुफान गारपिटीत या झाडावरील बहुतांश पोपट जखमी झाले आहेत. यापैकी 300 पोपटांचा दुर्देवी अंत झाला होता.
ना शवविच्छेदन, ना पंचनामा; गारपिटीत मृत्यू झालेली जनावरं गोठ्यातच पडून; शेतकरी हतबल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 11:52 AM