लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी अस्थिकलश घेऊन आलेले शेतकरी विजय जाधव यांच्या अटकेचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले. शेतकरी मंत्र्यांना भेटूच शकणार नाहीत, असे धोरण तरी ठरवा असा टोला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासनाला हाणला. या अटक प्रकरणी चौकशीची मागणी शिवसेनेने केली. कर्जबाजारीपणामुळे राज्यात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. या पार्श्वभूमीवर, सांगली जिल्ह्यातील २५ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अस्थींचा कलश घेऊन वाळवा तालुक्यातील विजय जाधव हे कर्जमाफीसाठी मोटारसायकलवरून महाराष्ट्रभरात फिरत आहेत. शेतकरी वाचवा, कर्जमाफी करा, या मागणीसाठी त्यांनी अनके लोकप्रतिनिधींची भेट घेतली पण त्यांना कोणी दाद दिली नाही. शनिवारी जाधव हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईत आले होते. मंत्रालयासमोरील आकाशवाणी येथील आमदार निवासात ते थांबले होते. मात्र रात्री २.३०च्या सुमारास त्यांना नरिमन पॉइंट पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर सकाळी त्यांना आझाद मैदानात सोडण्यात आले. यासंदर्भात शिवसेनेचे मुंबईतील आमदार अजय चौधरी यांनी आज विधानसभेत आवाज उठविला.जाधव यांच्यावरील पोलीस कारवाईची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी त्यांना पाठिंबा दिला. ‘या प्रकरणी चौकशी करून विधिमंडळाचे विशेष अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात निवेदन केले जाईल, असे सांसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. गृहराज्यमंत्री भेटलेशिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, आ.अजय चौधरी, राजन साळवी आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आझाद मैदान येथे आंदोलन करणारे जाधव यांची भेट घेऊन विचारपूस केली. दुपारी गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी जाधव यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या, स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू करा आदी मागण्या जाधव यांनी केल्या.
शेतकरी अस्थिकलश आणणाऱ्यास अटक
By admin | Published: May 22, 2017 12:41 AM