मुंबई - राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या अखेरच्या अधिवेशनात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शेतकरी कर्जमाफीवरून सरकारला चांगलेच धारेवर धरले. फडणवीसांनी गाजावाजा करून जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचं मुंडे म्हणाले. मुंबईत माध्यमांशी बोलताना मुंडे यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केला.
सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी फसवी असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी दिवाळीत राज्यातील शेतकऱ्यांना बोलवून त्यांचा सत्कार करून कर्जमाफी केल्याचे प्रमाणपत्र दिले. मात्र त्या शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी मिळाली नाही. त्याचे पुरावे आम्ही सभागृहात दिले आहे. महाराष्ट्र सरकार ज्या शेतकरी कर्जमाफीसाठी स्वत:ची पाठ थोपटून घेते ती संपूर्ण कर्जमाफीच फसवी असल्याचे दावा धनंजय मुंडे यांनी केला.
वाशीम जिल्ह्यातील अशोक मनवर नावाच्या शेतकऱ्याला कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर मुंबईत बोलवून कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिले होते. त्याच शेतकऱ्यांला अद्याप कर्जमाफी मिळाली नाही. मनवर हे शेतकरी माझ्याकडे आले, त्यांनी मला राज्य सरकारने दिलेले कर्जमाफीचे प्रमाणपत्र दाखवले. मनवर हे एकमेव शेतकरी नसून प्रमाणपत्र मिळूनही कर्जमाफी न झालेले हजारो शेतकरी महाराष्ट्रात असल्याचं मुंडे यांनी सांगितलं. कर्जमाफीच्या यादीत नाव येऊन, बँकेचा मॅसेज मिळवून देखील अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचं यावेळी मुंडे म्हणाले.
याउलट अशोक मनवर हे शेतकरी मुख्यमंत्र्यांनी दिलेले कर्जमाफीचे प्रमाणपत्र घेऊन सरकारला जाब विचारण्यासाठी आले असता त्यांना विधानभवन परिसरात अटक करण्यात आली, असं सांगत मुंडे यांनी सरकारचा निषेध केला. तसेच अटक शेतकऱ्याची ताबडतोब सुटका करा, अशी मागणी त्यांनी केली.