सरसकट शेतकरी कर्जमाफीचा मार्ग होणार मोकळा ?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 11:22 AM2019-11-11T11:22:29+5:302019-11-11T11:22:55+5:30
शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसने सरकार स्थापन केल्यास, या तिन्ही पक्षांना सर्वात आधी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागणार आहे. या संदर्भात पक्षांकडून कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते.
मुंबई - भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापन करण्याऐवजी विरोधीपक्ष म्हणून सभागृहात बसण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेनेकडून सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाली करण्यात येत आहेत. राज्यातील या घडामोडींमुळे बळीराजा आनंदीत असून आता बळीराजाला सरसकट कर्जमाफीचे वेध लागले आहेत.
भारतीय जनता पक्ष वगळता विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांकडून शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती. यात काँग्रेस-राष्ट्रवादीने सरसकट कर्जमाफीचे आश्वसन दिले होते. तर शिवसेनेने शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचं आश्वासन दिलं होते. त्यामुळे शेतकऱ्यांना या तिन्ही पक्षांकडून चांगल्याच आपेक्षा आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपने राज्यात शेतकरी कर्जमाफी केली होती. परंतु, अनेक निकष आणि अटी यामुळे प्रत्येक गावातील बोटावर मोजण्याइतपत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. त्यामुळे शेतकरी वर्गात मोठी नाराजी होती. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आशा आहे. आता शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सरकार स्थापन करणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय देखील घेतला आहे.
दरम्यान शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसने सरकार स्थापन केल्यास, या तिन्ही पक्षांना सर्वात आधी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागणार आहे. या संदर्भात पक्षांकडून कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. राष्ट्रवादी-काँग्रेसकडून तर पहिल्या कॅबिनेट बैठकीत कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं सांगितलं होतं. आता हे आश्वासन पूर्ण करण्यात उभय पक्ष किती वेळ लावणार याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागली आहे.