लातूर : दुष्काळ निवारणासाठी केंद्र व राज्य शासन असंवेदनशील आहे़ तातडीच्या उपाययोजना तर, केलेल्या नाहीतच, पण कायमस्व्ांरुपी योजना करीत असल्याचा कांगावा सरकार करीत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी येथे रविवारी केली. सद्यस्थितीत दर दिवसाला सरासरी ९ शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत़ संपूर्ण कर्जमाफी दिली तरच या आत्महत्या थांबतील, असा दावा त्यांनी केला़औसा येथे दुष्काळ परिषद झाल्यानंतर लातुरातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण म्हणाले, कर्जमाफी देण्याऐवजी कर्जाचे पुनर्गठन करण्याचे शासन बोलत आहे़ मात्र यामुळे आत्महत्या थांबणार नाहीत़ उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर १६ हजार गावे शासनाने दुष्काळी म्हणून जाहीर केली़ दीर्घकालिन उपाययोजना ठीक आहेत़ पाणीपुरवठ्याच्या टँकरवर प्रशासनाचे कंट्रोल नाही़ दुष्काळाचा दुरुपयोग पैसा कमविण्यात केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला़ मुख्यमंत्री पंतप्रधानांकडे दुष्काळी पॅकेजची मागणी करीत आहेत़ पण हे पॅकेज मिळायचे कधी आणि जनतेला दिलासा कधी देणार असा प्रश्न आहे़, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
कर्जमाफी दिली तरच शेतकरी आत्महत्या थांबतील
By admin | Published: May 09, 2016 3:34 AM