कार्लेखिंड : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील शेतकरी हंगामी भाजीपाल्याचे दर कोसळल्याने चिंताग्रस्त झाले आहेत. अलिबाग तालुक्यात या हंगामात वाल, घेवडा, तोंडली, कारली, दुधी, घोसाळी, पडवळ आदी प्रकारची भाजी मोठ्या प्रमाणात काढली जाते. अलिबाग तालुक्यातून ८० टन भाजी रोज वाशी येथील बाजार समितीमध्ये विक्रीसाठी जाते. दरवर्षी चांगला भाव शेतकऱ्यांना मिळतो, परंतु या वर्षी सुरुवातीपासूनच भाजीचे दर कमी आहेत.
यंदा पावसाळा लांबला त्यामुळे उन्हाळ्यातील भाज्यांची लागवड करण्यास उशीर झाला. एक महिना उशिरा भाजीपाला उत्पादन होऊनसुद्धा भाज्यांचे दर वाशी बाजारात कमी मिळत आहेत. बी-बियाणे, खते, औषधे याचा खर्चसुद्धा यंदा शेतकऱ्यांना निघणार नसल्याने ते चिंतेत आहेत.
गेल्या वर्षी याच वेळी वीस ते तीस रुपये प्रतिकिलो दर होता, मात्र या वर्षी चार ते पाच रुपये दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी राजा कसा तगणार या चिंतेत पडला आहे. अलिबागची तोंडली जगप्रसिद्ध आहे. तरीसुद्धा या वर्षी बाजारभाव मिळत नाही. वाशी येथे भाज्यांची आवक जास्त वाढल्याने सर्व भाज्यांचे भाव गडगडले आहेत, असे मत या बाजार समितीमधील व्यापाºयांचे आहे.यंदा पाऊस सर्वत्र पडल्यामुळे भाज्यांचे उत्पादन वाढले आहे. तसेच कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यातूनसुद्धा मोठ्या प्रमाणात भाजीची आवक वाढली आहे. यामुळे सुरुवातीपासूनच भाज्यांचे दर कमी झाले आहेत. - शंकर पिंगळे, संचालक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, मुंबईया वर्षी भाजीपाल्याला चांगला दर नसल्याने आमच्या खर्चाची रक्कमसुद्धा वसूल होणार नाही, याची चिंता सतावत आहे. - मधुकर पाटील, शेतकरीभाजी उत्पादनात वाढ झाल्याने मुंबई येथे योग्य दर मिळत नाही. आम्ही शेतकºयांना अदा केलेली रक्कम वसूल होणार नसल्याने आम्हालासुद्धा या वर्षी नुकसान सोसावे लागणार आहे. - संदीप पाटील, स्थानिक व्यापारी