- ओडिशा- तेलंगणा पोलिसांची संयुक्त मोहीम
पुणे : मध्य प्रदेशातील खांडवा कारागृहातून पसार झालेल्या तसेच पुण्याच्या फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात बॉम्बस्फोट घडवणाऱ्या पाच दहशतवाद्यांपैकी तिघांंना गुप्तचर यंत्रणा,ओडिशा, तेलंगणा पोलिसांनी ओडिशामध्ये केलेल्या संयुक्त कारवाईत पकडण्यात आले. गेल्यावर्षी पाचपैकी दोन दहशतवादी आंध्र प्रदेशात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाले होते. दहशतवाद विरोधी पथकाची (एटीएस) दोन पथके तिकडे रवाना करण्यात आली आहेत. शेख मेहबूब ऊर्फ गुड्डू शेख ऊर्फ इस्माईल (वय ३०), अमजद रमजान खान (वय ३५), झाकीर हुसैन बद्रुल हुसैन ऊर्फ सादिक (वय ३३, तिघेही रा. गणेश तलाई, खांडवा, मध्यप्रदेश), मोहम्मद सलिक ऊर्फ सल्लू अब्दुल हकीम (वय ३२, रा. गुलशननगर, खांडवा, मध्यप्रदेश) अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. आंध्रप्रदेश पोलिसांसोबत नालगोंडा जिल्ह्यामध्ये ४ एप्रिल २०१५ रोजी झालेल्या चकमकीत मोहम्मद एजाजुद्दीन ऊर्फ एजाज ऊर्फ रियाज ऊर्फ राहुल (वय ३२) आणि मोहम्मद अस्लम अयुब खान (वय २८) या दोघांना कंठस्नान घालण्यात आले होते. हे सर्वजण सिमीचे सक्रि य दहशतवादी आहेत. १ आॅक्टोबर २०१३ रोजी डॉ. अबू फैजल इम्रान, मेहबूब उर्फ गुड्डू इस्माईल खान, अमजद रमजान खान, झाकीर हुसेन ऊर्फ सादीक ऊर्फ विकी डॉन ऊर्फ विनयकुमार बद्रुल हुसेन, एजाजुद्दीन, अस्लम यांनी खांडवा कारागृहामधून पलायन केले होते. नंतर डॉ. अबू फैजलला अटक करण्यात आली होती. झाकीर, अमजद, शेख मेहबूब ऊर्फ गुड्डू, एजाज आणि अस्लम यांनी १० जुलै २०१४ रोजी फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात बॉम्बस्फोट घडवला होता. पुणे पोलीस आणि एटीएसने सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपींचा कोल्हापूरपर्यंत माग काढला होता. कर्नाटक आणि बिजनौरमध्ये त्यांनी वास्तव्य केले. तेथे घरात बॉम्ब तयार करीत असताना गॅसचा स्फोट होऊन मेहबूब गुड्डू ६० टक्के भाजला होता. ओडिशातील राऊरकेला येथील माला रोड भागामध्ये ते असल्याची माहिती मिळताच बुधवारी सकाळी गुप्तचर यंत्रणा,ओडिशा आणि तेलंगणा पोलिसांनी त्यांना घेरले. त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला.तब्बल तीन तास दोन्ही बाजुने गोळीबार सुरु होता. शेवटी शरणागती पत्करलेल्या दहशतवाद्यांना पाच बंदूका, काडतुसांसह अटक करण्यात आली. गुड्डूची आई नजमाबी हिलाही अटक केली आहे. ती सुध्दा एटीएसच्या रडारवर होती.