मुंबई : राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात तृतीय श्रेणीचे काम करूनही चतुर्थ श्रेणीचे वेतन मिळत असल्याचा प्रकार महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी महासंघाने उघडकीस आणला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळावी, म्हणून महासंघाने सात दिवसांपासून आझाद मैदानात साखळी उपोषण सुरू केले आहे.सार्वजनिक बांधकाम खात्यातील कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक असलेले बहुतेक कर्मचारी पूर्वीपासून चतुर्थ श्रेणीच्या वेतनश्रेणीवर काम करत होते. त्यातील बहुतेक कर्मचाऱ्यांचा हुद्दा कामानुसार वाढवून तृतीय श्रेणीत समावेश करण्यात आला. मात्र, काही कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत कोेणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे २४ एप्रिल २००१ प्रमाणे इतर कर्मचाऱ्यांना दिलेल्या लाभाप्रमाणे पूर्वलक्ष्यी प्रभावाने लाभ देण्याची मागणी महासंघाने केली आहे. शिवाय सार्वजनिक बांधकाम विभागातील लिपिक संवर्गात अद्याप नवीन पदांची निर्मिती करण्यात आलेली नाही. त्यामुळे सरासरी दोन कर्मचाऱ्यांचे काम एका कर्मचाऱ्याला करावे लागत असल्याचा दावा महासंघाने केला आहे. जोपर्यंत मागण्यांवर ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत सरकारविरोधात आझाद मैदानात उपोषण सुरूच राहील, असा इशारा महासंघाने दिला आहे. (प्रतिनिधी)
सा.बां.विभागातील कर्मचाऱ्यांचे उपोषण
By admin | Published: February 29, 2016 3:43 AM