मुंबई : वडिलोपार्जित जागा बळकावणाऱ्या धनदांडग्यांविरुद्ध लढा देणाऱ्या शेतकऱ्याला गावकऱ्यांनी वाळीत टाकले आहे. त्यामुळे शकील अहमद महंमद बलोच (अक्कलकुवा, नंदुरबार) या ७०वर्षीय शेतकऱ्यावर मुलीच्या लग्नाची तयारी करण्याऐवजी आझाद मैदानात उपोषण करण्याची वेळ आली आहे. १४ जानेवारीपासून ते उपोषणाला बसले असून, रोज ते एका वेळचे जेवण घेत आहेत.बलोच हे तीन एकर जमिनीवर उदनिर्वाह करतात. त्यांच्या दोन मुली शिक्षिका असून, दोघी शिक्षण घेत आहेत. मोठ्या मुलीचे लग्न जुळवलं. लग्नाची तारीख ठरली. काही दिवसांतच दारात मांडव उभा राहणार तोच गावकऱ्यांनी वाळीत टाकले. शकील अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, मालकीची सात एकर जमीन खोटी कागदपत्रे बनवून ट्रस्टच्या नावाखाली मौलाना गुलाम मोहम्मद वस्तावनी यांनी बळकावली आहे. हक्काच्या जागेसाठी लढा दिल्याने समाजातील लोकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला आहे. मुलीची वरात गावात येऊ न देण्याची धमकी दिली आहे, असे त्यांनी सांगितले.
वाळीत टाकलेल्या शेतकऱ्याचे उपोषण
By admin | Published: April 11, 2016 2:48 AM