पणजी : गोव्यातील इंग्रजी शाळांचे अनुदान बंद करावे व मराठी-कोकणी शाळांनाच अनुदान द्यावे, अशी मागणी करत भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या नेतृत्वाखालीशनिवारी राज्यात १९ ठिकाणी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. पणजीतील कार्यक्रमात भाजपाचे आमदार विष्णू वाघ यांनीही भाग घेतला. आता प्रत्यक्ष संघर्षाचा टप्पा सुरू झाल्याचे भाषा सुरक्षा मंचचे नेते प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी जाहीर केले. राज्यभर झालेल्या कार्यक्रमात काही माजी आमदार, पंचसदस्यांनीही भाग घेतला. मराठी व कोकणी प्रेमींनी सरकारच्या धोरणाचा निषेध केला. येथील आझाद मैदानावर उपोषण करण्यात आले. भाजपाचा मंत्री व आमदाराने आंदोलकांसोबत जाऊ नये, असा सरकारचा आदेश असला तरी, वाघ यांनी भाषाप्रेमींची बाजू घेतली.सायंकाळी उपोषणाच्या समारोपावेळी वेलिंगकर म्हणाले, की आतापर्यंत आम्ही मातृभाषेतूनच प्राथमिक शिक्षण व्हावे या सिद्धांताबाबत राज्यभर जागृती केली. सरकारविरोधात प्रत्यक्ष निदर्शने केली जातील. काँग्रेस सरकारचा निर्णय आम्हाला पुढे न्यावा लागला, असे सांगणाऱ्यांनी अगोदर आत्महत्या करायला हवी होती. आम्ही तडजोडीचा कोणताच प्रस्ताव स्वीकारणार नाही. व्यक्तीपेक्षा विचार श्रेष्ठ, मातृभाषा व राष्ट्रवाद श्रेष्ठ हेच आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शिकवले आहे. (खास प्रतिनिधी)मुख्यमंत्री सामोरे गेले : मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आंदोलकांना सामोरे गेले. मुख्यमंत्री पाच मिनिटे आंदोलकांसमोर उभे राहिले. ‘भारत माता की जय,’ची घोषणा आंदोलकांनी दिली, तेव्हा मुख्यमंत्र्यांनीही हात उंचावून ‘जय’ असे म्हणत घोषणेस प्रतिसाद दिला.
मराठी-कोकणी शाळांसाठी गोव्यात उपोषण
By admin | Published: June 19, 2016 12:43 AM