ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 28 - शेतमालाच्या हमीभावाची जबाबदारी शासनाने घ्यावी, शेतमाल विक्रीसाठी शासनाने संघटित व्यवस्था निर्माण करावी, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी आदी मागण्यांसाठी कष्टकरी व कामगारांचे नेते बाबा आढाव यांनी राज्यव्यापी आंदोलनांची बुधवारी घोषणा केली. येत्या २ आॅक्टोबरपासून पुणे बाजार समितीमधील शिवाजी महाराजांच्या पुतळयाजवळ ते उपोषणाला बसणार आहेत. उपोषण एका सप्ताहाचे किंवा मागण्यांचा निर्णय लागेपर्यंत जे आधी घडेल तोपर्यंत सुरू राहील असे त्यांनी स्पष्ट केले आहे.शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या राज्यातील १८ हून अधिक केंद्रांमध्ये धरणे, उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेटटी, रघुनाथ पाटील यांनी पाठिंबा दर्शविला असल्याचे बाबा आढाव यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. यावेळी नितीन पवार, संतोष नांगरे उपस्थित होते. शेतकऱ्यांच हित साधण्याचा दावा करत राज्य शासनाने शेतमाल नियमन मुक्त केला, मात्र शेतमाल प्रचलित बाजार समितीमध्ये आणायचा नाही तर कुठे न्यायचा याचे कसलेही उत्तर शासनाने दिले नाही. शेतमाल विक्रीसाठी शासनाने संघटित व्यवस्था निर्माण करून त्याची जबाबदारी मार्केट समित्यांवर सोपवावी. समित्यांनी हमीभाव ठरवून ते स्क्रिनवर जाहीर करावेत. त्यासाठी हमीभाव फंड तयार करावा तसेच शेतमालाची नासाडी टाळण्यासाठी गोदामे, शीतगृहे, प्रक्रिया उद्योग समित्यांनी उभारावेत. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे बाबा आढाव यांनी सांगितले. ते म्हणाले, ह्यह्यशेतमाल विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. भाजीपाला कवडीमोल किंमतीने विकला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. आम्ही २० सप्टेंबरला या प्रश्नावर राज्यात सर्वत्र मोर्चे काढले, मात्र याची शासनाने साधी दखलही घेतलेली नाही. त्यामुळे उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.ह्णह्णस्वामीनाथन आयोगाने उत्पादन खर्च व त्यावर नफा यांचा मेळ घालून हमीभावाचे सुत्र ठरविले आहे. स्वामीनाथ आयोगाच्या या शिफारशींची अंमलबजावणी शासनाने करणे आवश्यक आहे. शेतकरी आत्महत्या केल्यानंतर सरकार त्याला मदत करीत आहे, त्याऐवजी तो मरण्यापूर्वीच शासनाने त्याला मदत करावी. केंद्रातील सरकार परकीय गुंतवणूक आणण्यासाठी धडपडत आहे, त्याऐवजी शेती व्यवसायाला प्राधान्य द्यावे. त्यातून अधिक रोजगार उपलब्ध होऊ शकेल असे बाबा आढाव यांनी सांगितले. यावर कृतीने उत्तर देतोय राज्यभरात मराठा क्रांती मोर्चा निघत आहेत याबाबत विचारले असता बाबा आढाव यांनी म्हणाले, राजकारण धर्मावर, जातीवर सुरू आहे, माणसाचं राजकारण होताना दिसत नाही. मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांपैकी आरक्षण, अॅट्रासिटी या मुददयावर सत्ताधारी व विरोधक बोलत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कुणीच बोलत नाही. महाराष्ट्राने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून आदर्श निर्माण करावा. त्यासाठीच मी यावर कृतीतून उत्तर देतो आहे.
शेतीमालाला हमीभाव मिळेपर्यंत बाबा आढाव करणार उपोषण
By admin | Published: September 28, 2016 4:41 PM