मुंबई : येथील अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यावेळी आपला मतदारसंघ सोडून मानखुर्द-शिवाजीनगरमधून मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. तर त्यांची कन्या सना मलिक ही नवाब मलिक यांच्या जागी अणुशक्तीनगरमधून निवडणूक लढवणार आहे.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर नवाब मलिक यांनी अजित पवार गटाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. भाजपकडून याला विरोध होऊनही अजित पवारांनी नवाब मलिकांना दूर केले नाही. आता महायुतीतील जागा वाटपात मुंबईतील अणुशक्तीनगर आणि मानखुर्द-शिवाजीनगर या दोन जागा अजित पवार गटाला मिळविण्याचा पक्षाकडून प्रयत्न आहे. २००९ च्या मतदारसंघ पुनर्रचनेत अणुशक्तीनगर मतदारसंघ अस्तित्वात आला. तेव्हापासून अणुशक्तीनगर मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत आतापर्यंत होत आली आहे. २०१४ च्या निवडणुकीत कातेंनी मलिकांचा पराभव केला होता. २०१९ च्या निवडणुकीत नवाब मलिक पुन्हा विजयी झाले होते. या मतदारसंघावर पकड असल्याने मलिक यांनी इथून आपली मुलगी सना मलिक यांना उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.
मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून सध्या समाजवादी पार्टीचे आबू आझमी आमदार आहेत. इथे मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने आहे. त्यामुळेच नबाव मलिक यांनी आबू आझमींविरोधात या मतदारसंघातून नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे.