वडील भाजपमध्ये, माजी मंत्र्याचा मुलगा जयंत पाटलांच्या भेटीला; ती जागा अजित पवारांना सुटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 02:12 PM2024-08-10T14:12:27+5:302024-08-10T14:12:59+5:30
Mahayuti Seat Sharing News: भाजपचा नेता इच्छुक असलेली जाग अजित पवार गटाला, अजित पवारांचा नेता इच्छुक असलेली जागा शिंदे गटाला आणि शिंदे गटाचा नेता इच्छुक असलेली जागा भाजपाला असा प्रकार होत आहे.
आघाडी आणि युतीत तीन-तीन पक्षांची भेसळ झाल्याने लोकसभेनंतर आता विधानसभेसाठी इच्छुकांचे पक्षांतर, गाठीभेटी सुरु झाल्या आहेत. भाजपचा नेता इच्छुक असलेली जाग अजित पवार गटाला, अजित पवारांचा नेता इच्छुक असलेली जागा शिंदे गटाला आणि शिंदे गटाचा नेता इच्छुक असलेली जागा भाजपाला असा प्रकार होत आहे. यामुळे या तिन्ही पक्षांचे नेते मविआकडे येरझाऱ्या घालू लागले आहेत. याच कारणातून माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या मुलाने जयंत पाटील यांची घेतली भेट घेतली आहे.
अभिजित ढोबळे हे सोलापूरमधील मोहोळ विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत. भाजपाचे प्रवक्ते असलेले माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे हे देखील या मतदारसंघातून विधानसभेला निवडून गेले होते. परंतू सध्या या मतदारसंघातून अजित पवार गट राष्ट्रवादीचे यशवंत माने हे आमदार आहेत. यामुळे महायुतीच्या जागावाटपात ही जागा अजित पवार गटाला सुटण्याची शक्यता अधिक आहे. या कारणामुळे अभिजित ढोबळे हे शरद पवार गटातून संधी मिळते का याची चाचपणी करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीला गेले आहेत.
महाविकास आघाडीच्या जागावाटपात मोहोळची जागा शरद पवार गटाला सुटण्याची शक्यता आहे. यामुळे ढोबळे यांनी आपल्या मुलाला जयंत पाटलांच्या भेटीला पाठविल्याची चर्चा आहे. ढोबळे - पाटील यांच्या भेटीमुळे जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, शरद पवार हे उद्यापासून सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याआधीच अभिजित ढोबळे यांनी पाटलांची भेट घेतल्याने या भेटीला महत्वाचे मानले जात आहे.