पंढरपूर : वडील वारकरी सांप्रदायातील नव्हते. त्यामुळे पांडुरंगाच्या वारीला जाण्यासाठी त्यांचा कडवा विरोध होता. पण हा विरोध झुगारून तब्बल २५वर्षे वारी केली. त्याचेच फळ अाज मिळाले. आम्ही धन्य झालो, अशी प्रतिक्रिया कार्तिकी एकादशीच्या वारीला आलेले वारकरी बाळासो हरिभाऊ मेंगाणे यांनी दिली. त्यांच्यासमवेत पत्नी आनंदी बाळासो मेंगाणे उपस्थित होती.
बाळासो हरिभाऊ मेंगाणे म्हणाले, अामची दोन एकर शेती असून भरपूर कष्ट करतोय. स्वताची शेती करीत आम्ही दोघेही मजुरी करतोय. केवळ कष्टातून मुलांना शिकविले. त्यांनी कष्टाची जाणीव ठेऊन शिकून दोघेही इंजिनियर झाले. दोघेही सद्या बाहेरच्या देशातील कंपनीत मोठ्या हुद्यावर काम करतात. आमची एकत्र कुटुंब पद्धत असून आमचा परिवार सुखी आणि समृध्द आहे. मुलाला नोकरी लागल्यानंतर अाम्ही सर्वजन पांडुरंगाच्या दर्शनाला आलो होतो.
आज दुपारी ३ वाजता दर्शन रांगेत उभे राहिलो. रात्री ११.३० वाजता आपण मानाचे वारकरी आहात असे मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. हे एकून अाम्ही धन्य झालो. अत्यानंद झाला, अशी भावना या दाम्पत्यांनी व्यक्त केली. दरम्यान, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ अॊसेकर महाराजांच्या हस्ते पाद्य पूजा सुरु झाली.