मुंबई – माझ्या घरात कुणी राजकारणी नाही. जानेवारी १९९२ मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत मी उभा राहण्याचा निर्णय घेतला. मी कॉलेजमध्ये शिकत असताना दिवसभर लोकांची वेगवेगळी काम करायचो. रात्री उशिरा घरी पोहचायचो. ७०० लोकसंख्येचं आमचं गाव होतं. लोकांनी मला निवडणुकीत उभं राहण्याचा आग्रह धरला. तेव्हा तत्कालीन काँग्रेस नेत्यांना तिकीट मागितली परंतु तिकीट दिली नाही. पण मी उभं राहिलो आणि जिंकलो. घरातून निवडणुकीत कुठलीही मदत झाली नाही. एकच कुर्ता पायजमा असताना मी निवडणूक जिंकलो अशी आठवण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी(Congress Nana Patole) सांगितले.
लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक अतुल कुलकर्णी यांनी नाना पटोलेंची Face to Face मुलाखत घेतली. त्यात ते बोलत होते. नाना पटोले म्हणाले की, माझ्याविरोधातील उमेदवार पहिल्या राऊंडमध्ये १२०० मतांनी पुढे होते. तेव्हा वडिलांनी याच्या बायकोसह घरातून बाहेर काढतो असं जाहीर केले. परंतु त्यानंतरच्या राऊंडमध्ये मी पुढे गेलो आणि ५ हजार मतांनी जिंकलो. भ्रष्टाचाराविरोधात काम करावं अशी तंबी वडिलांनी दिली होती. तसेच संस्था, कारखाने काढायचे नाहीत असं वडिलांनी बजावले. जी जबाबदारी आहे ती प्रामाणिक पार पाडावी असं वडील म्हणायचे. वडिलांनी सांगितलेले आजपर्यंत मी पाळलं आहे. वडिलांना दिलेला मंत्र आज माझ्या कामाला आला असं त्यांनी सांगितले.
वडिलांची अखेरची इच्छा पूर्ण करू शकलो नाही त्याची खंत
मी तिसऱ्या टर्मचा आमदार होता. तेव्हा माझ्या वडिलांना कॅन्सर झाला होता. वडिलांना डायलिसीचा प्रॉब्लेम होता. वडिलांच्या पोटात जास्त दुखू लागलं तेव्हा तपासलं असता त्यांचा कॅन्सर तिसऱ्या स्टेजला गेला होता. वाचण्याची गॅरंटी नाही असं डॉक्टरांनी सांगितले होते. वडिलांचे ऑपरेशन करुन गाठ काढली होती. तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या भाऊ बहिणींना सांगितले नानाला सांगा मला घरी जाऊ द्या, पण डॉक्टरांच्या सांगण्यावरुन आम्ही वडिलांना हॉस्पिटलमध्येच ठेवलं होतं. वडिलांना अखेरचा श्वास गावात घ्यायचा होता पण डॉक्टरांच्या सांगण्यावरुन मी त्यांना हॉस्पिटलमध्येच ठेवले. वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करू शकलो नाही याची खंत आयुष्यभर माझ्या मनाला राहील.
‘मेंढीवाले नाना’ म्हणून प्रसिद्ध झाले
वडील नोकरीला होते त्यांना पगार खूप कमी होता. घरची शेती होती. त्यावेळची आर्थिक परिस्थिती आम्हाला खूप काही शिकवून गेली आहे. शेतीच्या वाटण्या झाल्यानंतर मी शेती करायला लागलो. आई वडिलांनी आम्हाला लोकांशी वागणुकीचं शिकवण दिली. उन्हाळ्यात विदर्भात राजस्थानचे मेंढपाल येतात. त्यांना शेतात बसवण्यासाठी पैसे दिले जायचे. मेंढ्याचे खत शेतीला मिळायचे. त्यांच्यासोबत मी जेवण करायचो. मी त्यांच्यात मिसळलो. त्यांनी मला एक मेंढा दिला होता. त्याचं आणि माझं खूप प्रेमाचं नातं तयार झालं. मी जिथे जायचो तो माझ्यासोबत यायचा. तेव्हापासून मेंढीवाले नाना म्हणून प्रसिद्ध झालो.
एअरफोर्सची नोकरी नाकारली
शाळा, कॉलेजमधील आठवणी कधीच संपत नाही. मानवी जीवनातील तो सगळ्यात महत्त्वाचा काळ असतो. मी चौथीपर्यंत जिल्हा परिषद शाळेत शिकलो. त्यानंतर पुढील शिक्षण चंद्रपूरमध्ये घेतलं. ८ वी ते १२ वी गोंदिया इथं शाळेत शिकलो. मी मिलिट्रीच्या परीक्षा दिल्या. एअरफोर्सच्या परीक्षेत मी पास झालो. तेव्हा नोकरीसाठी एक फॉर्म दिला होता. त्यात पालकांची सही घ्यायची होती. तेव्हा वडिलांनी सांगितले एक मुलगा कन्याकुमारीला आहे. तू काश्मीरला जा, आम्ही काशीला जातो. वडिलांचे हे बोलणं ऐकून मी तिथेच फॉर्म फाडून टाकला आणि आईवडिलांसोबत राहण्याचा निर्णय घेतला.