इंदापूर : पैसे देण्यास नकार दिल्याने मुलानेच मारहाण करून गमजाने नाक तोंड दाबून वडिलांचा खून केला. सोमवारी रात्री अकराच्या सुमारास शहरातील मंडईजवळ नगर परिषदेच्या गाळ्यानजीक ही घटना घडली. आरोपीस अटक करण्यात आली आहे. रहीम बंडू मुंडे (वय २४, रा. व्यंकटेशनगर, इंदापूर) असे आरोपीचे नाव आहे. बंडू बाबूलाल मुंडे (वय ५५, रा. व्यंकटेशनगर) असे मयताचे नाव आहे. त्यांचा मुलगा, आरोपीचा थोरला भाऊ शब्बीर बंडू मुंडे याने या प्रकरणी पोलिसांकडे फिर्याद दिली.मंडईतील गाळ्यात मुंडे यांचे दोन गाळे आहेत. आरोपी हा कामधंदा करत नाही. त्याला वाईट नाद आहेत. तो आई-वडिलांकडे सतत पैशांची मागणी करत असे त्यावरून कुटुंबीयांशी त्यांचे वाद होत. यापूर्वी वडिलांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. सोमवारी रात्री वडील घरी आले नाहीत. आरोपी उशिरा घरी आला. वडील कुठे आहेत याची त्याच्याकडे विचारणा केली असता, कोठेतरी पडले असतील असे उडवाउडवीचे उत्तर त्याने दिले. स्वत:च वडिलांना शोधून आणू असे म्हणून आईला घेऊन तो मंडईकडे गेला. नगर परिषदेच्या गाळ्याजवळ वडील पडलेले दिसले. तेथून वडिलांना उपचारासाठी उपजिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. तपसणी करून ते मरण पावल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. मंगळवारी सकाळी आई व भावाने खोदून चौकशी केली असता आरोपीने आपणच वडिलांना मारहाण केली. ते जोरात पडले. ओरडू लागले तेव्हा हातातील गमजाने त्यांचे नाक तोंड दाबून धरल्याचे आरोपीने सांगितले.>सावकाराचे घेतले होते पैसे... विजय चौगुले नावाच्या सावकाराकडून आरोपीने व्याजाने पैसे घेतले होते. मात्र फिर्यादीमध्ये हातऊसने पैसे घेतल्याचा उल्लेख आहे. विजयहा परवानाधारक सावकारी व्यवसाय करतो. पैसे परत करत नसल्याच्या कारणावरून चौगुले याने व्यंकटेशनगर येथील दगडू मारुती वाघमोडे व त्याच्या नातलगाला गेल्या पंधरा दिवसांपूर्वी बेदम मारहाण केली होती. त्यासंदर्भात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या पार्श्वभूमीवर चौगुले याचा ससेमिरा टाळण्यासाठी आरोपी वडिलांकडे सतत पैशाची मागणी करत होता. काल रात्री अकरा वाजता वडिलांकडे पैशांची मागणी केली. पैसे देण्यास त्यांनी नकार दिला. ते निघून चालले असता, पाठीमागून येऊन त्याने मारहाण केली.
पैसे न दिल्याने इंदापूरमध्ये वडिलांचा खून
By admin | Published: May 18, 2016 1:32 AM