ऑनलाइन लोकमतपुणे, दि. १० : घरामध्ये 18 वर्षीय अपंग मुलीचा मृतदेह आणि तेथून थोड्याच अंतरावर वडीलांचा झाडाला फाशी घेतलेल्या अवस्थेत तिच्या वडीलांचा मृतदेह आढळून आल्यामुळे लोहगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुलीच्या मृत्यूचा धक्का बसल्यामुळे वडीलांनी आत्महत्या केल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकरणामागील नेमके कारण शोधण्याचा पोलीस प्रयत्न करीत असून ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी मुलीचा व्हिसेरा राखून ठेवला आहे.
शुभांगी राजू बचोटे (वय 18) आणि राजू पंढरी बचोटे (वय 45, दोघेही रा. खंडोबाचा माळ, निरगुडी रस्ता, लोहगाव) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू बचोटे यांचा ठेकेदारीचा व्यवसाय आहे. ते विश्रांतवाडी येथील भिमनगरमध्ये राहण्यास होते. खंडोबाचा माळ येथे त्यांच्या घराचे बांधकाम सुरु होते. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून ते पत्नी व मुलांसह येथेच एक खोली भाड्याने घेऊन रहात होते. त्यांची मोठी मुलगी शुभांगी ही पायाने अपंग होती. मागील काही दिवसांपासून ती आजारी होती. राजू सकाळी कामासाठी म्हणून घराबाहेर पडले होते.
खंडोबाचा माळ येथे एका फलकाचे उद्घाटन असल्यामुळे त्यांची पत्नी आणि मुलगा त्या कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी घरामध्ये शुभांगी एकटीच होती. कार्यक्रम संपल्यावर जेव्हा तिचा लहान भाऊ परत आला तेव्हा घरामध्ये तोंडाला फेस आलेल्या तसेच बेशुद्धावस्थेमध्ये शुभांगी पडलेली त्याला दिसली. घाबरलेला तिचा भाऊ आईला सांगण्यासाठी धावला. शेजारी आणि घरमालकाच्या मदतीने सर्वांनी तिला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तिची अवस्था पाहून तेथील डॉक्टरांनी ससून रुग्णालयात हलवण्यास सांगितले. तिला ससून रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
दरम्यान, तिच्या वडीलांना घटनेची माहिती देण्यासाठी शेजारी त्यांचा शोध घेत होते. त्यांचा शोध घेत असतानाच घरापासून साधारणपणे 200 मिटर लांब असलेल्या एका मोकळ्या जागेमधील बाभळीच्या झाडाला त्यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. या घटनेची तातडीने पोलिसांना माहिती कळवण्यात आली. पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला. एकीकडे मुलीचा घरामध्ये झालेला संशयास्पद मृत्यू तर दुसरीकडे तिच्याच वडीलांनी गळफास घेऊन केलेली आत्महत्या यामुळे लोहगाव परीसरामध्ये एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शुभांगीचा मृत्यू आणि वडीलांची आत्महत्या यामागील नेमके ह्यकारणह्ण पोलीस शोधत आहेत. मात्र, मुलीच्या मृत्यूमुळे धक्का बसल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. तर या दोन्ही घटनांमागे वेगळाच संशय व्यक्त केला जात आहे. डॉक्टरांनी शुभांगीचा व्हिसेरा राखून ठेवला आहे. शवविच्छेदनाचा तसेच व्हिसेराचा अहवाल आल्यावरच तिच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) विलास सोंडे यांनी सांगितले. पुढील तपास सहायक निरीक्षक महेश तोगरवाड करीत आहेत.