मुंबई: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्याच्या रागातून ट्रॉम्बे पोलीस ठाण्यातील गणेश अडसुळ या फौजदाराने अमोल अवघडे या १९वर्षीय तरूणाला मारहाण केली. विशेष म्हणजे मारहाणीचा प्रकार पोलीस ठाण्यातच घडला. याप्रकरणी एसीबीने लाच मागितल्याबददल अडसूळला बेडया ठोकल्या आहेत. तसेच मारहाण केल्याप्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यातही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरात राहणार्या अमोलला बलात्काराच्या गुन्हयान्वये ट्रॉम्बे पोलिसांनी अटक केली होती. सध्या तो जामीनावर आहे. या गुन्हयाचा तपास अडसूळ करत होता. अडसूळने या गुन्हयात तुझ्या काकाचाही सहभाग आहे, त्यालाही अटक होऊ शकते, असे सांगून घाबरवले. तसेच काकाची अटक टाळण्यासाठी, या प्रकरणात लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्यासाठी अमोलकडे १५ हजार रूपयांची मागणी केली. मात्र अमोलने लाच न देता अडसूळची तक्रार एसीबीकडे केली. एसीबीने प्रथम या तक्रारीतील तत्थ्यता पडताळून पाहिली. त्यात अडसूळने लाच मागितल्याचे स्पष्ट होताच त्याच्याविरेाधात गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच अडसूळला पकडण्यासाठी सापळाही रचण्यात आला. मात्र हा सापळा फसला आणि अडसूळ त्यातून निसटला. दरम्यान, हा सापळा अमोलच्या तक्रारीवरून रचण्यात आल्याचे समजताच अडसूळ भडकला. अमोल नेहमीप्रमाणे काल ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात हजेरीसाठी आला तेव्हा अडसूळने त्याला अडवले. पोलीस ठाण्यातील तडीपार विभागात नेऊन त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. अडसूळच्या मारहाणीत अमोल गंभीर जखमी झाला. ही बाब त्याच्या कुटुंबियांना समजली. ते पोलीस ठाण्यात आले. त्यांनी हुज्जत घालून अमोलला अडसूळच्या तावडीतून सोडविले आणि सायन रूग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर कुटुंबियांना तक्रारीवरून ट्रॉम्बे पोलीस ठाण्यातच अडसूळविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्पुर्वी एसीबीने अडसूळला लाच मागितल्याबददल अटक केली.
फौजदाराने केली तक्रारदार तरूणाला बेदम मारहाण
By admin | Published: June 09, 2014 11:05 PM