मृत फौजदारावर गुन्हा दाखल : पोलीस दलात खळबळ नागपूर : सीताबर्डी पोलिसांचे ह्यपोहे प्रकरणह्णगरमच असताना याच ठाण्यातील मालखान्यातून देशी कट्यासह १४ लाख, २९ हजारांचा मुद्देमाल सहायक फौजदाराने (एएसआय) लंपास केल्याचे उघड झाले आहे. निळकंठ आत्राम असे आरोपी फौजदाराचे नाव असून, त्याचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. १ आॅगस्ट २००७ ते २०१२ या कालावधीत आत्राम सीताबर्डी पोलीस ठाण्यात मालखान्याचा प्रमूख (इन्चार्ज) होता. त्याने पदाचा दुरूपयोग करीत मालखान्यातील सोने,चांदी, रोकड आणि अन्य मौल्यवान चिजवस्तूंसह देशी कट्टाही चोरला. ही बाब उघड झाल्यानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती.वरिष्ठांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश देण्यात आले. उपरोक्त कालावधीत पोलीस ठाण्यात कोण-कोण मालखान्याचे इन्चार्ज होते, त्याची करण्यात आली. तीन ते चार वर्षे चाललेल्या चौकशीच्या गु-हाळानंतर हा मुद्देमाल आत्रामच्या कार्यकाळात चोरीला गेल्याने त्यानेच तो लंपास केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. त्यानंतर शनिवारी रात्री या प्रकरणी आत्राम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे, आत्राम यांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांना आरोपी बनविण्यात आल्याने चोरीला गेलेल्या मालाची रिकव्हरी कशी होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
फौजदारानेच केली सीताबर्डी ठाण्यात चोरी
By admin | Published: July 17, 2016 12:42 AM