गणेश वासनिक,
अमरावती- पावसाळा सुरू होताच घोरपड, हरीण, नीलगाय, तितेर, बटेर, ससे, मोर आदी वन्यजिवांची तस्करी करून त्यांच्या मांसविक्रीच्या घटना उघडकीस येत आहेत. वने आणि वन्यजिवांचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदे तयार केले असले तरी त्यांची अंमलबजावणी होत नसल्याने चोरट्यांना कसलेच भय राहिले नसल्याचे या घटनांवरून पाहायला मिळत आहे. अमरावतीत कासव, घोरपड आणि मांढूळ सापाच्या तस्करीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. मांढूळ साप बाळगल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. अमरावतीनजीकच्या पोहरा जंगलात आठ जणांनी घोरपडीची शिकार करून मांस खाल्ल्याचे चित्र सोशल मीडियावर ‘अपलोड’ झाले. नांदगाव खंडेश्वर येथे पोलीस ठाण्याच्या संरक्षण भिंतीलगत असलेल्या बेड्यावर हरणाचे मांस उघडपणे विकले जात असताना कोणतीही कारवाई केली जात नाही. जळगाव, ठाणे, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यात बिबट्यांच्या शिकारी झाल्या आहेत. अशाच प्रकारचे अनेक गुन्हे संपूर्ण राज्यभरात होत असून, ते असेच पचविले जातात, असे वन्यप्रेमी संघटनांनी सांगितले. वन्यजिवांचे संरक्षण करण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणीही त्यांच्याकडून होत आहे.>‘वन पाटील’ ही संकल्पना गुंडाळलीराज्यात एकूण ४४ हजार गावे आहेत. या गावांमध्ये वन्यजीव, जंगलांचे संरक्षण करण्यासाठी पोलीस पाटलांच्या धर्तीवर ‘वन पाटील’ नियुक्त करण्याची संकल्पना पुढे आली होती.तत्कालीन वन मंत्री बबनराव पाचपुते यांच्या कार्यकाळात याविषयी चर्चादेखील झाली. वन पाटील नियुक्त करताना रोजगार हमी योजनेतून मानधन देण्याचा प्रस्तावही पुढे आला. परंतु पुढे अचानक ही संकल्पनाच गुंडाळण्यात आली.>यांची होतेय शिकार? : हरीण, ससे, काळवीट, घोरपड, मांढूळ साप, कासव, मोर, नीलगाय, तितेर, बटेर, जंगली वराह, चितळ, भेडकी, रानमांजर, कोल्हा, मुंगूस आणि चौसिंगा