- हेमंत बावकर
नवी मुंबई : भारंभार चॅनेल देण्याऐवजी केवळ पसंतीचे चॅनेल निवडता यावेत आणि त्याच चॅनलचे पैसे अदा करावेत अशी योजना ट्रायने आणली खरी परंतू याद्वारे कंपन्यांनी धूळफेक सुरु केली आहे. 130 रुपयांत 100 चॅनेल देण्याचे आदेश असताना मनमानी करत यासाठी करांसह 176 रुपये उकळले जात आहेत. शिवाय या पहिल्या 100 चॅनेलमध्ये लोकांच्या पसंतीस उतरणारा एकही चॅनल नसल्याने हे पैसे कशासाठी मोजायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ट्रायने गेल्या महिन्यात आदेश काढत जेवढे चॅनल पाहाल, त्याचेच पैसे द्याल असे सांगत आवडीचे चॅनल निवडीचे स्वातंत्र्य लोकांना बहाल केले. ही योजना येत्या 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या पसंतीच्या चॅनल निवडीच्या योजनेची शहानिशा केली असता वेगळेच धक्कादायक वास्तव समोर येत आहे. ट्रायच्या आदेशानुसार नेटवर्क कॅपॅसिटी फी (NCF) मध्ये 130 रुपये आणि कर असे 154 रुपयांमध्ये 100 चॅनेल दाखविण्यात येणार आहेत. मात्र या चॅनेलच्या यादीमध्ये दूरदर्शनचे 28 चॅनल वगळल्यास अन्य चॅनेल हे अपवाद वगळता काहीच उपयोगाचे नाहीत. मराठीमध्ये एक दोन चॅनेलच या लिस्टमध्ये देण्यात आले आहेत. हे चॅनेल फारसे पाहिले जात नाहीत.
तसेच कंपन्यांनी आणखी 25 चॅनल दाखविण्यासाठी 20 रुपये आणि टॅक्स आकारले आहेत. यानुसार एकूण 176 रुपये केवळ कमी पाहिल्या जाणाऱ्या चॅनेलसाठी मोजावे लागणार आहेत. म्हणजेच पसंतीच्या चॅनेलसाठी एसडी आणि एचडी साठी 1 ते 20 रुपयांपर्यंत दर आकारून दर महिन्याला 200 ते 400 रुपयांचे रिचार्ज करणाऱ्यांचा खर्च 500 ते 700 रुपयांवर जाणार आहे. ट्रायने ग्राहकांच्या मागणीवरून त्यांच्या हितासाठी घेतलेला निर्णय आतबट्ट्याचा ठरणार असे स्पष्ट होत आहे.
टाटा स्कायशी संपर्क साधल्यावर त्यांनी सध्या महिना 415 रुपयांचा प्लान असलेल्यांना सुचविलेला नव्या नियमांचा प्लान हा 534 रुपये आणि 550 रुपयांचा आहे. म्हणजेच तब्बल 110 ते 135 रुपये जादा मोजावे लागणार आहेत. शिवाय यामध्ये काही एचडी आणि एसडी चॅनेल नसणार आहेत. यामुळे त्यावर तुम्हाला या प्रत्येक चॅनलसाठी आणखी 10 ते 19 रुपये मोजावे लागणार आहे.
पसंतीचे चॅनेल पाहण्यासाठी किती पैसे लागणार? TRAI चे चॅनल सिलेक्टर अॅप्लिकेशन आले
अशीच परिस्थिती अन्य डीटीएच सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांच्या ग्राहकांची असणार आहे. यामुळे NFC च्या नावावर 176 रुपयांचा भुर्दंडच लोकांवर लादला गेल्याचे स्पष्ट होत आहे.
या 100 चॅनलची टाटा स्कायने जाहीर केलेली लिस्ट खाली दिलेली आहे.
https://www.tatasky.com/wps/portal/TataSky/tata-sky-compliances