लेखक, अभिनेता चिन्मय मांडलेकर याला एका राजकीय पक्ष प्रमुखाच्या साधेपणाचा अनुभव नागपूर विमानतळावर आला. याबाबत त्याने फेसबुकवर पाेस्ट लिहीत त्या नेत्याचे काैतुक केले आहे. ''आज सामान्य पक्षीय पदाधिकारीदेखील लवाजमा घेतल्याशिवाय फिरत नाहीत, तिथे हा पक्षप्रमुख सामान्यासारखा पाठीवर सॅक मारुन रांगेत उभा राहतो हे विलक्षण आहे'', असे मांडलेकर याने आपल्या पाेस्टमध्ये लिहीले आहे.
चिन्मय मांडलेकर काल नागपूर विमातळावरुन मुंबईला येत हाेता. त्यावेळी त्यांला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबडकर यांच्या साधेपणाचा अनुभव आला. फ्लाईट 40 मिनिटे उशीरा असल्याने प्रकाश आंबेडकर हे सामान्य व्यक्तीप्रमाणे पाठीवर सॅक घेऊन विमानतळावर फ्लाॅईटची वाट पाहत उभे असल्याचे मांडलेकर याला दिसून आले. त्यांच्यासाेबत कुठल्याही कार्यकर्त्याचा लवाजमा नव्हता. आंबेडकरांचा साधेपणा मांडेलकर याला चांगलाच भावला. त्याने आंबेडकरांशी मनमाेकळ्या गप्पा मारल्या आणि त्यांच्या साधेपणाचे काैतुक केले.
''काल नागपूर विमानतळावर फ्लाईट ४० मिनिटं लेट. वेटिंग एरियात बसायला ही जागा नाही. ताटकळत उभा असताना, खंद्यावर सॅक, त्याच्या साईड पॉकेटमध्ये पाण्याची बाटली, साधा शर्ट, पॅन्ट अशी ही व्यक्ति दिसली. आधी वाटलं "आयला! हा माणूस सेम टू सेम प्रकाश आंबेडकरांसारखा दिसतो". पण फोनवर बोलतानाचा त्यांचा आवाज ऐकून कळलं "अरे, प्रकाश आंबेडकरच आहेत." महाराष्ट्राच्या राजकारणातलं गेल्या काही वर्षातला महत्वाचा नेता. पण बरोबर हुजर्यांचा लवाजमा नाही, बाऊनर्स वगैरे तर नाहीच नाहीत. कुठलीच वी.आय.पी ट्रीटमेंट नाही. एअरपोर्टवर बसायला ही जागा नसताना जवळ जवळ ४० मिनिटं ताटकळत उभे होते. अर्थात लोकं भेटत होती, फोटो काढत होती. आमची भेट झाल्यावर मनमोकळ्या गप्पा मारत उभे राहिलो. राजकीय भुमिका पटो न पटो, पण माणसाचा साधेपणा कमाल आहे! आज सामान्य पक्षीय पदाधिकारीदेखील लवाजमा घेतल्याशिवाय फिरत नाहीत, तिथे हा पक्षप्रमुख सामान्यासारखा पाठीवर सॅक मारुन रांगेत उभा राहतो हे विलक्षण आहे. बाय द वे, ज्या एअरपोर्टवर हे झालं त्या एअरपोर्टला यांच्याच आजोबांचं नाव आहे. तरीही No VIP treatment! #Respect. ''असे मांडलेकर याने आपल्या पाेस्टमध्ये लिहीले आहे.