अनेक प्रश्न : गुंतवणूक करणारे नामानिराळे!
मुंबई : सुमारे १ हजार कोटी रुपयांच्या मुदत ठेव (एफडी) घोटाळ्यात आपापल्या संस्थांचे कोट्यवधी रुपये गुंतवणाऱ्या बड्या धेंडांवर कारवाई होत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. काही जणांवर थातूरमातूर कारवाई झाली; पण आपल्या संस्थांच्या कोट्यवधींच्या ठेवी संकटात टाकणारे बहुतेक लोक नामानिराळे राहिले. घोटाळ्याचा एक मुख्य सूत्रधार संतोष गडगे अद्याप फरार आहे. एमएमआरडीए, लिडकॉमसह राज्य शासनाच्या अनेक महामंडळांच्या अधिकाऱ्यांनी दलालांमार्फत बँकांमध्ये एफडी ठेवल्या. असेच प्रकार मुंबईतील साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीसह नामवंत संस्थांनी केले.एफडींच्या बोगस पावत्या दलालांनी बनविल्या आणि मूळ पावत्यांवर कोट्यवधी रुपयांचे ओव्हर ड्राफ्ट देण्यात आले. या घोटाळ्याच्या निमित्ताने काही प्रश्न समोर आले आहेत. शासनाच्या ज्या महामंडळांनी एफडी ठेवल्या त्यांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या गुंतवणुकीची शाहनिशा का केली नाही? या अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई शासकीय पातळीवरून का झाली नाही? शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या अपहाराची जबाबदारी कोणावरच कशी निश्चित करण्यात आली नाही. पोलीस यंत्रणा आपले काम करतच आहे पण प्रशासकीय कारवाई का झाली नाही, असे मुद्दे उपस्थित होतात. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी मोहम्मद फसिउद्दिन याने अनेक प्रताप केले. घोटाळ्याच्या पैशांतून त्याने काही चित्रपटांची निर्मिती केली. ते फ्लॉप झाले. त्याच्या शोमॅन ग्रूप कंपनीने घोटाळ्यातील पैसा इकडून तिकडे फिरविला. एफडी घोटाळ्यात अटक करण्यात आलेले प्रभाकर डिंगणकर हे बँक आॅफ इंडियाच्या तळोजा (नवी मुंबई) येथील शाखेचे व्यवस्थापक होते. लोकमतच्या शनिवारच्या अंकात ते कळंबोली शाखेचे व्यवस्थापक असल्याचे अनावधानाने प्रसिद्ध झाले होते. (विशेष प्रतिनिधी)