मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) मुंबईसह ठाणे, नाशिक, बुलढाण्यात बनावट सौंदर्य प्रसाधने आणि बनावट औषध साठ्यावर कारवाई केली आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांना कुलाबा येथील सिप्ला या उत्पादकाकडे सेरोफ्लो इन्हेलर औषधाचा बनावट साठा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, निर्मल रामचंद्र खतवानी यांच्याकडे चौकशी केल्यावर ३५ कंटेनर्स जप्त करण्यात आले. या कंटेनरवरील उत्पादन व मुदतबाह्य दिनांक, कोडनंबर यामध्ये तफावत आढळली आहे. याविषयी संबंधितांविरुद्ध प्रथम खबरी अहवाल दाखल केला आहे. तसेच ठाणे येथील मेघा एप्रिकॉट स्क्रब, वसंत जूंज हर्बल कॉस्मेटिक्स कॉ. व रामेश्वरम केमिकल या उत्पादकांचे विनापरवाना उत्पादित करण्यात येणारे जवळपास १० लाखांचे बनावट सौंदर्यप्रसाधने जप्त केली आहेत, याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे. आक्षेपार्ह जाहिराती करणाऱ्या राजश्री ट्रेडर्सवर धाड टाकून १० लाख ५५ हजार रुपयांचा आयुर्वेदिक औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी, वसंतकुमार त्यागी याच्याकडून विविध आयुर्वेदिक औषधे, डायबेटिस, कॅन्सर, ओबेसिटी, ट्यूमर इ. आजारांकरिता दावा करणारी जप्त औषधांमध्ये अॅक्सिओम, या उत्पादकाचा खोटा दावा करुन विकली जाणारी औषधे सापडली. तर भिवंडीच्या कांचन फार्मा येथून औषधाच्या साठ्यात आक्षेपार्ह मजकूर आढळल्याने ६ लाख रुपयांचा साठा जप्त केला.बुलढाणा येथे मे.एस.व्ही. एंटरप्राईसेस या दुकानात बोगस ग्राहक पाठवून बनावट सौंदर्य प्रसाधनांची विक्री होत असल्याबद्दल धाड टाकली. या उत्पादकाकडे कोणताही परवाना नव्हता. वसंत भट्टी यांच्याकडून जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे साडेतीन लाख आहे. तर नाशिक येथे सिप्ला कंपनीची औषधे विशेष सवलत दराने प्राप्त करुन घेऊन त्यांची खोटी मागणीपत्रे व बिले तयार करण्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. यात करवा फार्मास्युटिकल्स व चौधरी अँड कं यांचा सहभाग असल्याचे आढळले. त्यांनी सिप्ला कंपनीच्या वैद्यकीय प्रतिनिधींशी संगनमत करुन हा प्रकार केल्याचे आढळले. दोन्ही संस्थांविरुद्ध प्राथमिक नाहिती अहवाल दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
बनावट सौंदर्य प्रसाधने व औषधांवर एफडीएची कारवाई
By admin | Published: January 28, 2017 3:56 AM