पुणे : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने शहरातील किराणा माल, मिठाई यांच्या विक्रेत्यांवरील कारवाईस सुरुवात केली आहे. मागील २ दिवसांत प्रशासनाने बुधवार पेठ येथील काही दुकाने आणि मार्केट यार्डमधील विक्रेत्यांवर केलेल्या कारवाईत ११ लाखांहून अधिक किमतीचा माल जप्त केला आहे. दिवाळीसाठी ग्राहक बाजारातून मोठ्या प्रमाणात कच्च्या मालाची खरेदी करतात. हा माल चांगल्या प्रतीचा नसल्यास त्यातून आरोग्याचे अनेक प्रश्न उद्भवू शकतात. यावर निर्बंध यावेत यासाठी प्रशासनाने हा कारवाईचा बडगा उगारला असून, बुधवार पेठेतील ४ विक्रेत्यांकडील माल संशयावरून जप्त करण्यात आलेला आहे. यामध्ये पनीर, बटर यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचा तर बर्फी, खवा यांसारख्या मिठाईचाही समावेश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. रविवारी एका दिवसात प्रशासनाने केलेल्या कारवाईत १२६० किलोचा जवळपास २ लाखांचा खवा ताब्यात घेण्यात आला असून, त्याच्या दर्जाचा संशय आल्याने तो प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला असल्याचे अन्न प्रशासनाचे सहायक आयुक्त शिवाजी देसाई यांनी सांगितले. याशिवाय सोमवारी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत मार्केट यार्ड येथील ४ घाऊक विक्रेत्यांकडून ८ लाख ५० हजार ८३७ रुपये किमतीचे वनस्पती तूप व खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे.ही कारवाई अन्न प्रशासनातील सहायक आयुक्त एस.पी. शिंदे यांच्या पथकाने केली असून, यामध्ये विजय उनवणे, धनश्री निकम, योगेश ढाणे, प्रशांत गुंजाळ, खेमा सोनकांबळे हे अन्न सुरक्षा अधिकारी सहभागी होते. दिवाळी येईपर्यंत ही कारवाई अशाच पद्धतीने चालू राहणार असून, नागरिकांनी कोणतेही अन्नपदार्थ खरेदी करताना योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाचे सहायक आयुक्त शिवाजी देसाई यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
दिवाळीसाठी एफडीए सज्ज
By admin | Published: October 19, 2016 1:07 AM