ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - रेल्वेमध्ये थेट विदेशी गुंतवणुकीला चालना देण्याचा विचार पंतप्रधान व रेल्वेमंत्र्यांनी बोलून दाखवला असतानाच, या प्रकारची पहिली गुंतवणूक मुंबई पनवेल जलदगती मार्गासाठी होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. मुंबई पनवेल जलदगती मार्गाची नितांत गरज असून त्यासाठी १४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. या मार्गासाठी २० टक्के एफडीआय मिळवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले.
थेट विदेशी गुंतवणूक, विदेशी संस्थातम्क गुंतवणूकदार आणि स्थानिक गुंतवणूकदार अशा तिघांचा समावेश रेल्वेच्या सीएसटी पनवेल प्रकल्पासाठी करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सोमय्या म्हणाले. रेल्वेमध्ये गुंतवणूक आली तरच अत्याधुनिक सुविधा देणे शक्य असल्याचे तसेच रेल्वेचा कायापालट करणे शक्य असल्याचे स्पष्ट मत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले होते. त्या पार्श्वभूमीवर सीएसटी पनवेल जलदगती मार्गासाठी वेगाने हालचाली होतील अशी अपेक्षा आहे. सध्या या मार्गावर दोनच मार्गिका असून प्रचंड प्रमाणात वाढलेल्या लोकसंख्येमुळे या मार्गावर प्रवाशांचा असह्य ताण आहे. आणखी दोन मार्गिका वाढल्यास त्याचा फायदा काही लाख प्रवाशांना होणार आहे.