- आशीष गावंडे
अकोला, दि. ४ : नायगाव परिसरातील 'डम्पिंग ग्राउंड'वर कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. शहरातून कचरा घेऊन जाणाऱ्या वाहनांना या ठिकाणी जाण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने कचरा टाकण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. या समस्येवर तोडगा निघत नसेल तर मुंबईत ज्याप्रमाणे देवनार येथे डम्पिंग ग्राउंडवर आग लागण्याची घटना घडली असाच प्रकार नायगावमध्ये होण्याची शक्यता आहे नायगावस्थित 'डम्पिंग ग्राउंड'च्या जागेवर अतिक्रमकांनी केलेला कब्जा व कचऱ्याची कायमस्वरूपी विल्हेवाट लावल्या जात नसल्यामुळे याठिकाणी आता कचरा साठवणुकीसाठी जागाच शिल्लक नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
कचरा टाकण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिक्रमकांकडून धमक्या व शिवीगाळ केली जात असल्याने मनपा कर्मचाऱ्यांनी शहराच्या इतर भागात कचरा टाकण्यास सुरुवात केली आहे. हा मुद्दा निकाली काढण्यासाठी सत्ताधारी भाजप-शिवसेनेने पुढाकार घेण्याची गरज असताना तसे होत नसल्याचे चित्र आहे. प्रभाग क्रमांक १ अंतर्गत येणाऱ्या नायगाव परिसरातील मनपाच्या मालकीच्या सुमारे १० एकर जागेवर शहरातून निघणाऱ्या दैनंदिन कचऱ्याची साठवणूक केली जाते. मागील काही वर्षांपासून या भागात लोकसंख्येची वाढ झाली, शिवाय अतिक्रमकांनी मोठ्या प्रमाणात 'डम्पिंग ग्राउंड'च्या जागेवर कब्जा केल्याचे चित्र आहे. ज्या जागेवर कचरा टाकल्या जातो, नेमक्या त्याच जागेवर अतिक्रमकांनी घरे उभारली आहेत.
अतिक्रमकांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे कचऱ्याची साठवणूक करताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना विविध अडथळ्यांच्या सामना करावा लागत आहे. यात भरीस भर कचऱ्याची कायमस्वरूपी विल्हेवाट लावल्या जात नसल्यामुळे याठिकाणी कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. परिणामी, नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मनपाने ठोस प्रकल्प उभारण्याची गरज आहे. सद्यस्थितीत कचरा साठवणुकीसाठी 'डम्पिंग ग्राउंड'वर जागा शिल्लक नसल्याची परिस्थिती आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्यामुळे कचरा जमा करणारे वाहनचालक शहराच्या इतर भागात कचरा टाकून मोकळे होत आहेत. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, पावसाच्या दिवसांत साथ रोगांचा फैलाव होण्यास मदत होत आहे.