मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने राज्य सरकारने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना केली. मात्र आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या नावाखाली अभ्यासक्रमात बदल करण्यात आले असून इयत्ता चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा भाग वगळण्यात आला आहे. यावर इतिहासकार, तज्ज्ञ शिक्षक आणि ऐन निवडणुकीत विविध राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला आहे. मात्र चौथीच्या विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीप्रमाणे शिवाजी महाराजांचा अभ्यासक्रमातील संदर्भ मर्यादित ठेवून पुढे सहावीच्या पुस्तकात त्याची सविस्तर मांडणी करण्यात येणार असल्याचे आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रम विकसन समितीने स्पष्ट केले आहे.
इतिहासाच्या नव्या आंतरराष्ट्रीय संशोधनानुसार इतिहासाला सामाजिक, आर्थिक, राजकीय असे अनेक आयाम असतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन इतिहासाची ओळख एक विषय म्हणून पाचवीपासून करून देण्यात येणार आहे. प्रादेशिक अस्मिता कायम ठेवून राष्ट्रीय दृष्टिकोन विकसित करण्याचा शिक्षण मंडळाचा प्रयत्न राहणार आहे. यामध्ये छत्रपती शिवरायांचा इतिहास हा इयत्ता सहावीमध्ये मांडण्यात येणार आहे, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला, ही भीती अनाठायी असल्याचे मत मांडण्यात आले.
मात्र मंडळाच्या या निर्णयावर निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एमआयईबी संस्थेचे संकेतस्थळ नाही. या संस्थेची स्थापना, कार्यपद्धती, काम करणारे अधिकारी, संस्थेचा पत्ता, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके इत्यादी कोणतीही माहिती कुठेही उपलब्ध नाही. शिवाय ही पुस्तकेही सर्वत्र उपलब्ध नाहीत. त्यामुळे गोपनीयतेबद्दल इतके प्रश्न असताना त्यासंदर्भात खुलासा का केला जात नाही, अशी प्रतिक्रिया शिक्षणतज्ज्ञ वसंत काळपांडे यांनी दिली. मुद्दा शिवाजी महाराजांचा इतिहास कधी शिकवायचा हा असेल आणि एससीईआरटीला तो सहावीसाठी योग्य वाटत असेल, तर तसा आदेश शासनाकडून मिळवावा. पण सध्या तरी विधिमंडळाच्या पटलावर जे आहे ते मान्य करायला हवे, असे मत शिक्षणतज्ज्ञ किशोर दरक यांनी शैक्षणिक ग्रुपवर मांडताना व्यक्त केले. नवीन संशोधनानुसार मुलांना इतिहास सहावीत कळणार असेल तर कोणत्या संशोधनानुसार मुलांना पहिलीत संस्कृत भाषा समजेल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.