नागपूर : मेडिकल इस्पितळाच्या परिसरात एका महिलेची हत्या करून तिचा विवस्त्रावस्थेतील मृतदेह झुडूपात फेकून देणा-या आरोपीच्या अवघ्या पाच तासात मुसक्या बांधण्याची कामगिरी पोलिसांनी बजावली. विवाहबाह्य अनैतिक संबंधातून तिच्या प्रियकरानेच तिची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले असून, आरोपीने हत्या केल्यानंतर ओळख पटू नये म्हणून दाखविलेला क्रूरपणाच त्याची ओळख पटविण्यास साहाय्यभूत ठरल्याची माहिती प्रभारी पोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी या हत्याकांडासंबंधाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
अर्चना अनिल भगत (वय ३५) असे मृत महिलेचे नाव आहे. तर, आरोपीचे नाव गुरुदयाल राजमन पाठक (वय ५०) असून तो मेडिकलमध्ये शवविच्छेदन विभागात सहकक्ष परिचालक आहे.
गुरुदयाल आणि अर्चनाचे अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते. ते विवाहित असूनही भांडेप्लॉटमधील एका भाड्याच्या खोलीत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांच्या अनैतिक संबंधामुळे दोन्ही कुटुंबीयांमध्ये नेहमीच वाद होत होते. त्यामुळे पतीने अर्चनाला दोन वर्षांपासून सोडून दिले होते. तिला एक मुलगा आणि मुलगी आहे. ते त्यांच्या आजोबाकडे राहायचे तर, आरोपीला देखिल एक २० वर्षांचा मुलगा आहे. आरोपी गुरुदयालची शुक्रवारी रात्री ड्युटी होती. त्यामुळे तो आणि अर्चना सायंकाळी ७ वाजता मेडिकलमध्ये आले. काही वेळेनंतर हे दोघेही तेथेच दारू प्यायले. नंतर गणेशपेठमध्ये एका खानावळीत जेवायला गेले. तिकडून आल्यानंतर शवविच्छेदन विभागासमोर ते बसले. तेथे क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे आरोपीने अर्चनाला दारूच्या नशेत बेदम मारहाण केली. ती बेशुद्ध पडल्यानंतर तो विच्छेदन गृहात गेला. रोजच अनेक मृतदेहाची चिरफाड करीत असल्यामुळे त्याने तेथून कटर घेतले अन् अर्चनाचा गळा कापून तिला ठार मारले. तिची ओळख पटू नये म्हणून आरोपीने तिच्या चेहºयावरची स्कीन (कातडी) पुरती सोलून काढली अन् अंगावरचे कपडे फेकून दिले. त्यानंतर मृतदेह झाडीझुडपात लपवून ठेवला. शनिवारी सकाळी ९.३० च्या सुमारास विवस्त्रावस्थेत अर्चनाचा मृतदेह पडून दिसल्याने एकच खळबळ उडाली.
मृत महिला विवस्त्रावस्थेत दिसल्यामुळे तिच्यावर बलात्कार झाला असावा, असाही संशय घेतला जात होता. मेडिकलमध्ये हत्या झाल्याची माहिती कळताच अजनी पोलिसांचा ताफा, सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे, अतिरिक्त आयुक्त श्यामराव दिघावकर, पोलीस उपायुक्त रविंद्रसिंग परदेशी, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, अजनीचे ठाणेदार शैलेष संख्ये तसेच गुन्हे शाखेचे अधिकारीही तेथे पोहचले. महिलेची ओळख पटवून आरोपीचा शोध घेण्यासाठी अजनी आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांची सात पथके तयार करण्यात आली.
वनिताचे प्रसंगवधान !
ज्या पद्धतीने महिलेच्या चेह-यावरची कातडी सोलली होती, ते पाहता शवविच्छेदनाचे काम करणाराच कुणी आरोपी असावा, असा संशय पोलिसांना आला. तो धागा धरून पोलिसांनी तपास सुरू केला. मेडिकलमध्ये काम करणा-या एकाचे अनैतिक संबंध असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने दिली होती. अजनी ठाण्यात कार्यरत पोलीस शिपायी वनिता मोटघरेला हे माहित होते. त्यामुळे तिने त्या तक्रारीत नमूद असलेल्या आरोपीचे नाव (गुरुदयाल पाठक) वरिष्ठांना सांगितले. मृतदेहाशेजारी पोलिसांना एका कुलूपाची किल्ली मिळाली. ती किल्ली संशयीत आरोपी पाठक राहत असलेल्या भांडेप्लॉटमधील खोलीच्या बंद कुलूपाला लावली. त्या किल्लीने कुलूप उघडताच पोलिसांचा संशय अधिक घट्ट झाला. त्यामुळे पोलिसांनी पाठकला ताब्यात घेतले. त्याला अर्चनाबाबत विचारणा करण्यात आली. प्रारंभी असंबंध्द उत्तरे देणारा आरोपी दोन-चार प्रश्नातच गडबडला. त्याने तो मृतदेह अर्चनाचा असल्याचे आणि तिची हत्या केल्याची कबुली दिली.
तपास पथकाचे कौतूक
कोणताही पुरावा नसताना तसेच मृत महिलेची ओळख नसताना अवघ्या चार तासात हत्येसारख्या गंभीर गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला अटक करण्याची कामगिरी पोलिसांनी बजावली, ही बाब कौतुकास्पद असल्याचे सह पोलीस आयुक्त बोडखे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्यामराव दिघावकर, उपायुक्त रविंद्रसिंग परदेशी, उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त सोमनाथ वाघचौरे, किशोर सुपारे, गुन्ह्याचा छडा लावण्यात महत्वाची भूमीका वठविणारे अजनीचे ठाणेदार शैलेष संख्ये, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर, सहायक निरीक्षक प्रदीप अतुलकर, प्रदीप धोबे आदी उपस्थित होते.