पुणे : कर्णबधीरांचं आंदोलन सुरू असताना त्यांच्यावर लाठीमार झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. या सरकारची लाज वाटते. हे फडणवीसांचं नव्हे, तर जनरल डायरचं सरकार असल्याची घणाघाती टीका असल्याचं सुळेंनी म्हटलं. कर्णबधीर विद्यार्थी इकडे उपाशी पोटी आंदोलन करत आहेत आणि तिकडे वर्षा बंगल्यावर स्नेहभोजनाचा कार्यक्रम सुरु आहे. या सरकारची लाज वाटते, अशा शब्दांमध्ये सुळेंनी संताप व्यक्त केला. आपल्या विविध मागण्यांसाठी समाजकल्याण कार्यालयावर मोर्चा घेऊन आलेल्या कर्णबधीर विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. संध्याकाळी उशिरापर्यंत या विद्यार्थ्यांनी येथे ठिय्या मांडला होता. संध्याकाळी खासदार सुप्रिया सुळे यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेतली. मी तुमच्या पाठीशी आहे, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. आंदोलक विद्यार्थ्यांना काहीतरी खाऊन घेण्याची तसंच पाणी पिण्याची विनंतीदेखील त्यांनी केली. 'भाजप सरकार चोवीस तास निवडणुकीच्या मोडमध्ये असतं. मुख्यमंत्री राज्यात हेलिकॉप्टरनं फिरत असतात. परंतु एकाही मंत्र्याला त्यांना इकडे पाठवता येत नाही. या सरकारची लाज वाटते. आज जर या आंदोलनावर तोडगा निघाला नाही, तर मी उद्या स्वतः या मुलांसोबत आंदोलनाला बसेन. ज्या पोलिसांनी या मुलांवर लाठीचार्ज केला आहे, त्या अधिकाऱ्यांची पारदर्शक चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करायला हवी, अन्यथा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा,' अशी मागणी सुळेंनी केला.सुळे यांनी फोनवरून सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याशी संपर्क करायचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तसेच त्यांनी धनंजय मुंढे यांना फोन करून अधिवेशनात या विद्यार्थ्यांचा प्रश्न मांडण्याची विनंती केली.