- डॉ. नीरज देव आताशा कोणता आजार प्रमाणाबाहेर बळावला असेल, तर तो म्हणजे ‘भावना दुखणे.’ कोणाच्या भावना कोठे, केव्हा व कशामुळे दुखावतील, याचा काही नेमच सांगता येत नाही. भावना दुखवायला वेगवेगळ्या जातीपाती, महापुरुष, व्यवसायविषयक भाष्य काय वाटेल ते चालते. बरे हे लिखाण वा भाषण गंभीरच असले पाहिजे, असे काही नाही विनोदातील असले तरी पुरते. दुखणाऱ्या भावनांची ही उदाहरणे आताशा पदोपदी पाहायला मिळतात. त्यामुळे एक प्रश्न स्वाभाविकच मनात डोकावतो की, आपल्या पूर्वजांना भावनाच नव्हत्या की काय? किंवा असल्या, तरी फारच बोथटलेल्या असाव्यात! पूर्वज म्हणजे काही फार जुन्या काळाचे नाही २०-२५ वर्षांपूर्वींचे, मग हे दुखणे आताच का बरे वाढले असावे?कोणी म्हणेल, ‘आता आमची अस्मिता जागृत झालीये. तिला ठेच बसली, तर आम्ही कशी सहन करणार?’ माझा आक्षेप या वाक्यातील दोन शब्दांना आहे. १ ‘आमची’ व २ ‘अस्मिता’. या स्वतंत्र भारतात आपण सारे एक आहोत ‘तुम्ही’ ‘आम्ही’ नाही, तर ‘आपण’ आहोत आणि मला सांगा, शिवछत्रपती, बाबासाहेब, वाल्मिकी वा परशुराम यांना जातीजातीत विभागणाऱ्या प्रवृत्तीला ‘अस्मिता’ तरी कसे म्हणायचे? हे सारे महापुरुष आपल्या साऱ्यांचे समान पूर्वज. त्यांचे हुंकार नि त्यांचे उद्गार आपणा साऱ्यांचे प्रेरणास्रोत आहेत. मग त्यांच्याविषयी माझा-तुझाचा दुजाभाव का? बरे! आपल्या या पूर्वजांना एकेरी हाक मारायचीसुद्धा चोरी अन् हो, यांच्या नावाच्या मागे-पुढे उपपद लावायलाच हवे, नाहीतर त्यांचा अपमान होतो आणि आमच्या भावना दुखवतात. राम व कृष्ण या जाचातून कसे सुटले, ते त्या रामालाच ठावे अन् गंमत म्हणजे सुटूनही दोघे अस्मितावानच आहेत. शेकडो वर्षांपासून तमाशांत वेगवेगळ्या फडावर उतरणारा, गवळणींची छेड काढणारा नटखट किसना आजही तितकाच पूज्य, वंद्य नि प्रात:स्मरणीय आहे; जगद्गुरु आहे. तुकोबा अन् ग्यानबाही तसेच आहेत मग शिवबा, भीमराव का होऊ नयेत?भावना दुखावतात म्हणून बोलूच नये का? ढळढळीत दिसणारे सत्य स्वीकारूच नये का? एखादा रुग्ण अत्यवस्थ असेल, तर घरच्यांच्या भावना दुखावतील, म्हणून सांगूच नये काय? एखादा मुलगा व्यसन करतो, हे त्याच्या घरी सांगितले तर घरच्यांना वाईट वाटेल, त्यांच्या भावना दुखावतील, म्हणून त्याला मनसोक्त ढोसू द्यावे काय?‘भावना दुखावते’ याचा अर्थ एकच होतो, ‘मला साधकबाधक विचार करायचाच नाही.’ मला आठवते, आचार्य रजनीश गांधीजींवर कठोर प्रहार करीत होते, तेव्हा मोरारजीभाई म्हणाले, ‘यामुळे आमच्या भावना दुखावतात, अशी टीका करू नका.’ त्यावर रजनीशांनी उत्तर दिले, ‘भावना दुखावतात म्हणून तुम्ही टीका करू नका असे म्हणाल, तर मी अजून कठोर टीका करीन. माझी टीका तुम्हाला चुकीची वाटत असेल, तर तुम्ही पुढे या. तुमचे विचार, तर्क व बुद्धिकौशल्य वापरून मला पराभूत करा. मला त्यात आनंदच वाटेल. मी या देशांत विचारांची क्रांती आणू इच्छितो.’ मला वाटते, भावनांच्या दुखण्या आडून आपण या वैचारिक क्रांतीला रोखत असतो.येथे मला एक म्हण हटकून आठवते ‘भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ.’ भावना म्हणजे मनातील सुखदु:खाचा भाव आणि कर्तव्य म्हणजे त्या पलीकडे जाऊन केलेला हितकर विचार. सुखापेक्षा हित नेहमीच उजवे असते, असायला हवे. भावनेत आपण केवळ आपल्याला काय रुचते, काय आवडते, याचाच विचार करत असतो, तर हितांत आपण आपल्याला भावणारे व आवडणारे योग्य की अयोग्य ते तपासत असतो. व्यक्ती वा समाजाच्या निकोप प्रगतीसाठी ही तपासणी गरजेची असते. त्यामुळेच असेल मानसशास्त्र असो वा तत्वज्ञान भावनेपेक्षा बुद्धीवरच अधिक भर देत असते. म्हणतात ना, ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ते उगाच नाही. त्याने आत्मपरीक्षण, भावनांचे परीक्षण करणे सुलभ जाते. मला वाटते दुखावलेल्या वा दुखणाऱ्या भावनांना बाजूला ठेऊन आपण तर्कशद्ध विचार करायला हवा. कोणी म्हणेल काही जण याचा गैरफायदा उचलून खोट्या-नाट्या कंड्या पिकवतील त्यांचे काय? थोडा विचार केला, तर लक्षात येईल, अशा प्रवृत्ती बोटावर मोजण्याइतक्याच मिळतील आणि मिळाल्या, तरी त्यांना उत्तर देताना आपली भावना; आपला विचार अधिकच जोमाने काम करील, त्यातून पुन:पुन्हा त्या विषयाचे अध्ययन, मनन व चिंतन घडेल. कदाचित, स्वत:च्या विचारांची पुनर्बांधणी होऊ शकेल व विचारांच्या क्रांतीकडे आपले एक पाऊल पडेल.
(लेखक प्रख्यात मनोचिकित्सक आहेत)