पुणे : राजकारण तापू लागले आहे तसतसे इच्छुकांचे वर्णी लावण्यासाठी ना ना प्रयास सुरू झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एका इच्छुक उमेदवाराने आपली वर्णी लागावी आणि दुसऱ्याने माघार घ्यावी म्हणून चक्क एका बुवाचेच पाय धरले!इच्छुक उमेदवार कोणत्या थराला जातील याचा काही नेम नाही. असाच एक किस्सा एकाच पक्षातील दोन इच्छुक उमेदवारांच्या स्पर्धेमध्ये घडला. समोरच्या स्पर्धक उमेदवाराने पक्षाच्या नेत्याकडे उमेदवारीसाठी माघार घेऊन आपले नाव सांगावे यासाठी त्यांना एकाने एका नामवंत बुवाकडे जाऊन तोडगा काढून घेण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे तो इच्छुक उमेदवार व त्याचे काही कार्यकर्ते बाबाकडे गेले. त्यांनी बाबाला विनंती केली, की माझ्याबरोबर पक्षात तिकीट मागणाऱ्या उमेदवाराचा बंदोबस्त करा. बाबाने लगेच तंत्रमंत्रविद्या सुरू केली. भात, भातात लिंबू व त्या लिंबांना टाचण्या टोचून त्यावर गुलाल टाकून उतारा तयार केला. हा उतारा त्या स्पर्धक उमेदवाराच्या घरासमोर जाऊन जमिनीत गाडा असे सांगितले. एवढा तोडगा करा, तो उमेदवार स्वत:होऊन पक्षातील नेत्याकडे जाईल व सांगेल की, ‘मला तिकीट नको, याला द्या, हाच निवडून येऊ शकतो, मी याचे मनापासून काम करेन.’ हे ऐकून सर्व कार्यकर्ते उतारा घेऊन गावी आले. हा उतारा कसा गाडायचा यावरून त्यांचे प्लॅनिंग सुरू झाले. रात्री १२पर्यंत सगळे दारू प्याले व तिघांवर याची जबाबदारी देण्यात आली. दारूच्या नशेत हे तिघे उतारा गाडायला त्या उमेदवाराच्या घरासमोर पोहोचले. घरासमोर येऊन एकाने खड्डा घ्यायला सुरुवात केली. तेवढ्यात समोरून तो उमेदवार आला. त्याला पाहून हे तिघे गडबडले. आता काय करायचे, याला काय सांगायचे, हा प्रश्न निर्माण झाला. तो उमेदवार जवळ आल्यावर त्याने त्या तिघांकडे पाहिले. परंतु तोही प्यायलेलाच होता. त्यामुळे त्याच्या हा प्रकार लक्षात आला नाही. त्याने त्या तिघांकडे पाहून ‘एवढ्या रात्रीचे दारू पिऊन कुठे फिरताय, व्हा घरी’ असा दम दिला. आपली थोडक्यात सुटका झालेली पाहून ते तिघेही तेथून पळाले व तो उतारा तसाच ओढ्यात फेकून दिला. थोडक्यात बचावलो. जर त्याने उतारा गाडताना पाहिले असते तर आपल्यालाच गाडले असते अशी एकमेकांमध्ये चर्चा करत ते तिघे नेत्यापाशी जाऊन पोहोचले. काम फत्ते केले. उतारा गाडून टाकला, असे खोटे सांगत नेत्याची वाहवा मिळवली व पुन्हा सगळे दारू प्यायला बसले. मात्र ही घटना बाकीच्यांच्या कानावर गेल्याने त्याची दबक्या आवाजात जोरदार चर्चा सुरू आहे.
वर्णी लागावी म्हणून बुवांचे धरले पाय!
By admin | Published: November 09, 2016 2:28 AM