ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - कुपोषणामुळे बालकांच्या होणा-या मृत्यूसाठी पालघर जिल्हा कुप्रसिद्ध आहे. गेल्या वर्षी येथील कुपोषणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेतही होता. मात्र, आता पालघर जिल्ह्याबाबत अभिमान वाटावा, अशी एक गोष्ट प्रकाशझोतात आली आहे.
पालघर जिल्ह्यातील नांदगाव येथे राहणा-या सुशीला खुरकुटे यांचा 8 मार्च रोजी म्हणजे महिला दिनी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सन्मान करणार आहेत. गाव हागणदारीमुक्त करण्याच्या योजनेत विशेष योगदान दिल्याबद्दल या आदिवासी महिलेचा शक्ती पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
सुशीला यांनी हाती घेतलेल्या कार्याची कहाणी तुम्ही ऐकाल तर थक्क व्हाल. सुशीला यादेखील गावातील इतर महिलांप्रमाणे उघड्यावर शौचाला जायच्या. यादरम्यान, त्यांनी स्वच्छ भारत अभियानाबाबत ऐकले. निरोगी राहण्यासाठी शौचालय असावं, म्हणजे कुटुंबाचे विशेषतः लहान मुलांचे आरोग्य जपता येईल, याचे महत्त्व त्यांनी जाणले.
आणि स्वतःचं शौचालय उभारायचं, असा निर्धार त्यांनी केला. घराची परिस्थिती हलाखीची असल्याने मजुर न बोलता त्यांनी स्वतःच हातात पहार घेत खड्डा खणायला सुरुवात केली. कौतुकास्पद बाब म्हणजे, 7 महिन्यांच्या गर्भवती असलेल्या सुशीला स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता रणरणत्या उन्हात खड्डा खणत होत्या.
शौचालय बांधायचं, या उद्देशाने झपाटलेल्या सुशीला यांनी लागपोठ तीन दिवस खड्डा खणण्याचे काम केले. योगायोगाने तेथून जात असताना युनिसेफचे सल्लागार जयंत देशपांडे यांनी त्यांचे हे परिश्रम पाहिले. यानंतर सरकारी मदतीने सुशीला यांचे शौचालय बांधून पूर्ण झाले. या कामगिरीमुळे त्या गावातील महिलांचे प्रेरणास्त्रोतही बनल्या.
पंतप्रधान कार्यालयानंही सुशीला यांच्या कार्याची दखल घेतली. आपण राहत असलेले गाव स्वच्छ असावे, यासाठी झटणा-या सुशीला यांचे परिश्रम पाहून पालघरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनीही फेब्रुवारी महिन्यात त्यांचा सन्मान केला होता.
गाव आणि शेजारील गावातील लोकं सुशीला यांना आपले प्रेरणास्त्रोत मानत असल्याने आम्ही फार आनंदीत आहोत, अशी प्रतिक्रिया निधी चौधरी यांनी दिली आहे. दरम्यान, या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी सुशीला आणि निधी चौधरी गुजरामध्ये दाखल झाल्या आहेत. गुजरातमधील गांधीनगर येथे होणा-या कार्यक्रमात शक्ती पुरस्काराने सुशीला यांना गौरवण्यात येणार आहे.
Salute to Sushila Khurkute, Nandgaon, Palghar, Maharashtra. She has dug for over 3 days for a toilet. @swachhbharatpic.twitter.com/BCYbMnCJbD— Param Iyer (@paramiyer_) February 10, 2017