मुंबई: विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपामध्ये दुरावा निर्माण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी थेट अजित पवारांच्या सोबत जाऊन सरकार स्थापन केलं. त्यामुळे राज्यात एकच राजकीय भूकंप झाला. यावर भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडेंनी भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करणं हा माझ्यासाठी धक्का होता, असं पंकजा म्हणाल्या. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या ८० तासांच्या सरकारवर भाष्य केलं. फडणवीस आणि पवार यांचा २३ नोव्हेंबरला शपथविधी संपन्न झाला. त्यावेळी राज्य राष्ट्रपती राजवटीमधून बाहेर पडलं याचा आनंद होता. पुन्हा मुख्यमंत्री झाल्याबद्दल मी देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदनदेखील केलं. पण या सरकार स्थापनेनं मला फार आनंद झाला नाही. तो माझ्यासाठी धक्का होता, असं पंकजा यांनी सांगितलं. अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय म्हणजे गनिमी कावा होता, असं फडणवीस म्हणाले होते. मात्र या गनिमी काव्याची भाजपामधील नेत्यांना कल्पनाच देण्यात आली नव्हती, असं पंकजा यांच्या विधानावरुन समजतं. फडणवीस आणि पवारांच्या शपथविधीबद्दल मला कोणतीही माहिती नव्हती. पक्षाच्या कोअर कमिटीची सदस्य असली तरी मला त्या निर्णयाची कल्पना नव्हती. त्यामुळे ज्यावेळी मी तो शपथविधी पाहिला, तेव्हा मला धक्का बसला, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं. अजित पवारांबद्दल मला फार बोलता येणार नाही, असं पंकजांनी म्हटलं. अजित पवार अतिशय स्पष्टवक्ते आहेत. पण माझा त्यांच्याशी फारसा संबंध आलेला नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल फार काही बोलू शकत नाही, असं पंकजांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचा शपथविधी पाहून कसं वाटलं?; पंकजांनी स्पष्ट मत मांडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 8:21 PM